
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक सुरू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिनी प्रशासन सतर्क झाले असून अधिकाऱ्यांची दडपशाहीही सुरू झाली आहे. शांघाय या शहरामध्ये पूर्वसूचना न देता दुकानांना टाळे ठोकले जात असल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अधिकारी ‘स्नॅप लॉकडाऊन’च्या नावाखाली ग्राहकांसह मालकांनाही दुकानांमध्ये कोंडताना दिसताहेत.
शांघायमध्ये कोरोना परिस्थिती बिकट आहे. येथे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होता. मात्र यात थोडी ढिल दिल्यानंतर अधिकाऱ्यांची दडपशाही सुरू आहे. नुकताच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आयकियाच्या (Ikea) स्टोअरमध्ये चिनी प्रशासनाचे अधिकारी घुसले आणि त्यांनी अचानक दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे दुकानामध्ये उपस्थित ग्राहकांमध्ये आणि मालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. लोक सैरावैरा धावू लागले आणि काही थेट अधिकाऱ्यांनाही भिडले.
上海徐汇宜家要禁止出入配合流行病学调查,吓得顾客赶快逃亡。在病毒被消灭之前不要在中国逛商场,切记。 pic.twitter.com/dAWbpbln7v
— 方舟子 (@fangshimin) August 14, 2022
आयकियाच्या एका दुकानामध्ये कोविडची लागण झालेला एक 6 वर्षीय मुलगा आला होता. याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी दुकानामध्ये पोहोचले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता दुकान बंद करू लागले. हा मुलगा या दुकानामध्ये कधी आला होता याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली नाही.
अधिकाऱ्यांनी दुकान बंद करण्याचा प्रयत्न केल्याने ग्राहकांची धावपळ सुरू झाली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या दुकानातील ग्राहकांना आणि दुकान मालकांना आता दोन दिवस विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार असून पाच दिवस त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.



























































