मनपाच्या जागेवरील बेकायदेशीर पक्के बांधकाम हटविले; अतिक्रमण विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । नगर 

कल्याण रोडवरील विद्या कॉलनी परिसरात महापालिकेच्या मोकळ्या जागेवर करण्यात आलेले पक्के आरसीसी बांधकाम अतिक्रमण विभागाने कारवाई करून हटविले. विभाग प्रमुख अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.2) सकाळी ही कारवाई करण्यात आली.

विद्या कॉलनी परिसरामध्ये महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर अज्ञात व्यक्तींनी 200 फूट बाय 20 फूट रुंदीचे पक्के आरसीसी बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. पाया खोदून प्लिथंपर्यंतचे बांधकामही करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी या संदर्भात महापालिकेकडे तक्रार केली होती. संबंधित प्रभाग कार्यालयाकडून याबाबत कारवाई न झाल्याने अतिक्रमण विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

मनपाच्या जागेवर सुरू असलेले हे बेकायदेशीर काम काढून घेण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख इथापे यांनी कारवाई करून सदरचे बेकायदेशीर बांधकाम हटवले. दरम्यान, महापालिकेच्या मालकीचा मोकळा भूखंड असताना या जागेवर अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीरपणे आरसीसी बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.