
भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या सांताक्रुझ पश्चिम येथील घरात बेकायदा बांधकाम केले असल्याचे पालिकेने आज केलेल्या तपासणीत उघड झाले आहे. पालिकेने आज सुमारे साडेतीन तास आज ही तपासणी केली. आजच्या सर्वेक्षणातील माहितीची पडताळणी सुरू असून लवकरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एच/पश्चिमचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.
सांताक्रुझ पश्चिम येथील एसव्हीपी रोडवर खुशी प्राइड बेलमोंडो या तेरा मजली बिल्डिंगमध्ये मोहित कंबोज यांचे चार फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रारी पालिकेच्या एच/पश्चिम कार्यालयात करण्यात आली होती. यानुसार पालिकेने मोहित कंबोज यांना त्यांच्या घराची तपासणी करणार असल्याबाबत नोटीस 21 मार्च रोजी बजावली होती.
लवकरच कारवाई होणार
पालिका अधिनियम 1888 नुसार बेकायदा बांधकामाला नोटीस दिली जाते. नोटीस दिल्यानंतर बेकायदा बांधकाम स्वतः हटवण्यासाठी ठरावीक दिवसांची मुदत दिली जाते. या मुदतीत बांधकाम हटवले नाही तर पालिका बेकायदा बांधकाम हटवून खर्चही वसूल करते. त्यामुळे कंबोज यांच्या घरातील बेकायदा बांधकामावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कंबोज यांनी तपासणीला सहकार्य करणार असल्याचे सांगत कुठल्याही बेकायदा बांधकामाबाबत पालिकेने नोटीस दिल्यास त्याला उत्तर देणार असल्याचे सांगितले आहे.


























































