मालवणी दारूकांड निकाल ; अवैध दारूच्या धंद्यांवर पोलिसांचे नियंत्रण नाही

मुंबईतील अवैध दारूच्या धंद्यांवर पोलिसांचे नियंत्रण नाही, अशा शब्दांत सत्र न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. मालवणी दारूकांड ही मुंबईतील दुर्दैवी घटना होती, असेही न्यायालयाने 241 पानी निकालपत्रात नमूद केले आहे.

गेल्या आठवडय़ात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. एस. डी. तावशीकर यांनी मालवणी दारूकांडाचा निकाल जाहीर केला. राजू तापकर, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डिमेलो व मन्सूर खान या आरोपींना न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा आरोपींना भोगावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. अवैध दारूचे धंदे रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले, असेही न्यायालयाने या निकालपत्रात पोलिसांना सुनावले.

मालवणीत अवैध दारूचे मशरूम

ही घटना म्हणजे मालवणीत अवैध दारूचे मशरूमच उगवले होते. स्वस्तात मिळणाऱया अवैध दारूने 106 लोकांचा जीव घेतला. 75 जणांना अंधत्व आले. हे सर्व झोपडपट्टीत राहणारे गरीब लोक होते. ही घटना घडल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि गुन्हे नोंदवण्यात आले, असेही न्यायालयाने फटकारले.

नुकसानभरपाईस नकार

गेली नऊ वर्षे आरोपी कारागृहात आहेत. त्यांची आर्थिक परिस्थितीत खालावलेली आहे. असे असताना आरोपींनी पीडितांना नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश देणे योग्य ठरणार नाही. पीडितांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळालेली आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र आदेश देणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण

मालवणीत नऊ वर्षांपूर्वी हे दारूकांड घडले. याप्रकरणी 15 आरोपींना अटक झाली. त्यातील एक आरोपी जामिनावर असताना फरार झाला. 14 आरोपींविरोधात खटला चालला. न्यायालयाने 10 जणांची पुराव्यांअभावी सुटका केली, तर 4 आरोपींना दोषी ठरवले. फरार आरोपीला अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात स्वतंत्रपणे खटला चालेल.