पोखर्णी फाट्यावर अवैध दारुच्या बाटल्या जप्त; जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पोखर्णी

परभणी तालुक्यातील पोखर्णी फाट्यावर मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी तोंड वर काढले आहे. अवैध दारु, मटका, तिर्रट, अवैध प्रवासी वाहतुक आदींचा समावेश असून याकडे स्थानिक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

येथील प्रगती धाब्यावर ६ फेब्रुवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पोखर्णी फाट्यावरुन धाड टाकून धाब्याचे मालक किशन दाजीबा बाराखुदे (रा. आंबेटाकळी) यांची चौकशी केली असता, त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली असता, पोलीसी खाक्या दाखविताच विदेशी दारुच्या १७ तर देशी दारुच्या ७ बाटल्या किंमत- २ हजार ८३४ रुपये व रोख ३ हजार आढळून आले. एकूण ५ हजार ८३४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय सोपान बडे करत आहेत.

पोखर्णी येथे श्री नृसिंह देवतेच्या दर्शनासाठी अखंड महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. तर नेहमीच नृसिंह मंदिराकडे विविध ठिकाणांवर पायीदिंड्या येत असतात. त्यातच पोखर्णी फाट्यावर अवैध वाहतुकीमुळे प्रवाशांना व भक्तांना जाण्यासाठी रस्ता सुद्धा शिल्लक राहत नाही. फाट्यावर तळीरांमाचा मुक्त संचार वाढलेला दिसून येत आहे. या ठिकाणी कायम वाहतुक पोलीसाची नियुक्ती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली असून याची दखल पोलीस प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे अवैध धंदे करण्याचे मनोबल वाढले आहे.