
अवैधरित्या जवळ पिस्तुल बाळगणार्या सराईताला सिंहगड रोड पोलिसांच्या दळवीवाडी फाटा परिसरातील प्रथमेश हॉटेल समोरून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
सागर जानू ढेबे (23, रा. वेल्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ढेबे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी काही गुन्हे दाखळ आहेत. स्वसंरक्षणासाठी त्याने पिस्तूल बाळगल्याचे तपासात समोर आले आहे. सिंहगड रोड पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान दळवीवाडी फाटा भागात एकजण संशयितरित्या थांबल्याची माहिती अंमलदार आबा उतेकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना मिळाली. यानूसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांच्यासह पथकाने ढेबे याचा शोध घेतला.
पोलीस दिसताच ढेबे याने पळ काढला. मात्र, पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपये किंमतीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. यानूसार ढेबेला पोलिसांनी अटक केली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.






























































