अलिबागमध्ये सरकारी जागेची बेकायदेशीर खरेदी, शाहरुखची मुलगी सुहाना कायद्याच्या कचाट्यात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान एका जमीन खरेदीच्या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. केवळ लागवडीसाठी असलेली अलिबागच्या थळ येथील सरकारी जमीन सुहानाने कोणत्याही परवानगीशिवाय 12 कोटी 91 लाखाला केवळ साठे करारावर खरेदी केल्याचा आरोप आहे. अलिबागमधील वकील ऍड. विवेकानंद ठाकूर यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारही केली आहे. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी अलिबागच्या तहसीलदारांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे पुत्र नारायण खोटे यांना 1968 मध्ये कुलाब्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱयांनी थळच्या समुद्रकिनाऱयालगतची जागा फळ लागवडीसाठी भाडेकराराने दिली होती. ही जमीन जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीशिवाय गहाण, विक्री अथवा इतरांच्या नावावर करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली होती. नारायण खोटे यांच्या निधनानंतर ती जमीन त्यांचे वारस असलेल्या अंजली खोटे, प्रिया खोटे आणि रेखा खोटे यांच्या नावे करण्यात आली. या वारसांनी जमीन विक्रीसाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे परवानगीचा अर्ज केला होता. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. म्हणजेच ही जमीन विकण्याची रितसर परवानगी मिळालेली नाही.

विक्रीची परवानगी मिळाली नसताना नारायण खोटे यांच्या वारसांनी 2023 रोजी ही जमीन परस्पर शाहरुख खान याची कन्या सुहाना खान हिला साठे कराराने विकली. हा व्यवहार पूर्णपणे बेकायदा असल्याने नोंदणीकृत साठेकरार रद्द करावा, अशी मागणी ऍड. विवेकानंद ठाकूर यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱयांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे असून वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे.

तक्रारदार म्हणतात

  • खोटे कुटुंबाकडून सुहाना खानने जी जमीन विकत घेतली, त्या जमिनीवर तीन बांधकामे असल्याचा उल्लेख साठे करारात आहे. परंतु तसा कुठलाही उल्लेख मंडळ अधिकारी मांढरे यांनी अलिबाग तहसीलदारांना दिलेल्या अहवालात नाही.
  • सीआरझेडची जागा विक्री करता येत नाही. जिल्हाधिकाऱयांची परवानगी नसताना केवळ साठे करारावर जागा विक्री अथवा ताबा देता येत नाही.
  • सुहाना खान आणि खोटे कुटुंबीयांनी महसुलाच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याने ही जागा सरकारजमा करावी.