
संगमनेर तालुक्यात सरावलेले वाळूतस्कर तस्करीसाठी कोणती शक्कल लढवतील, याचा काही नेम नाही. संगमनेर तालुक्यातून पुणे जिल्ह्याकडे वाळूतस्करी करताना काही ठिकाणी अडचणी येत असल्याने पठार भागातील वाळूतस्करांनी शक्कल लढवीत मुळा नदीपात्रातील पाण्यात मातीचा बंधारा घालून रस्ता तयार केला आहे. दरम्यान, या घटनेची चर्चा होताच संगमनेरचा महसूल विभागाने जेसीबीच्या साहाय्याने वाळूतस्करांचा मार्ग तोडून टाकला.
संगमनेर तालुक्यातील खैरदरा या परिसरातून हा मातीचा भराव घालून तयार केलेला रस्ता पारनेर तालुक्यातील या पवळदरा परिसरात निघतो. या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने वाळूउपसा करून वाळूचे मोठमोठे डंपर पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेले जातात. या बेकायदेशीर वाळूवाहतुकीला पठार भागातील जांबुत ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणावर विरोध केला होता. या विरोधामुळे वाळूतस्करांना चोरीची वाळू सहजासहजी पुणे जिल्ह्यात नेता येत नव्हती. त्यामुळे वाळूतस्करांनी शक्कल लढवून संगमनेर तालुक्यातून पारनेर तालुक्यात वाळूवाहतुकीसाठी मुळा नदीतच बंधारा घातला. या मार्गावरून वाळूवाहतूक करून पारनेर तालुक्यात नेऊन छोटय़ा गावांमधून वाळूचे डंपर थेट पुणे जिल्ह्यात नेण्यात येत होते.
वाळूचा बंधारामार्ग काही एका तासात होणारे काम नव्हते. नदीपात्रात पाणी असताना बांध घालून रस्ता तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर माती, रॅबिट आणि तत्सम प्रकारच्या गोष्टी लागल्या असणार आहेत. त्यासाठी यंत्रसामग्री लागली असणार आहे. त्यासाठी खूप वेळदेखील लागला असणार आहे. दरम्यान, या घटनेची चर्चा होताच संगमनेरचा महसूल विभाग खडबडून जागा झाला. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने वाळूतस्करांचा मार्ग तोडून टाकला आहे.
‘वाळूतस्करीसाठी मुळा नदीपात्रात मातीचा बंधारा घालून रस्ता तयार करणाऱ्यांवर, मग ते वाळूतस्कर असोत किंवा रस्ता तयार करणारे इतर दुसरे कोणी असोत, या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा रस्ता तयार करणारे, रस्ता तयार करवून घेणारे, यासाठी ज्यांची यंत्रसामग्री वापरण्यात आली आहे ते, तसेच हा रस्ता करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी विशेष प्रयत्न आणि परिश्रम घेतले, अशा सगळ्यांचा शोध घेऊन त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.’
– अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर.
वाळूतस्करांनी तयार केलेल्या रस्त्याची चर्चा होताच संगमनेरच्या महसूल प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने हा रस्ता उद्ध्वस्त केला.





























































