ठाण्यात बीफची 47; मटणाची 105 बेकायदा दुकाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

महापालिका क्षेत्रात बीफची 47 तर मटणाची विक्री करणारी 105 बेकायदा दुकाने असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बैल तसेच शेळ्या, मेंढय़ा, बोकड यांची तपासणी न करताच सर्रासपणे या प्राण्यांची कत्तल करण्यात येत असून निकृष्ट मांस खाल्ल्यामुळे लाखो खवय्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बीफ व मटणाची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याची स्पष्ट कबुली प्रशासनाने दिली असून ‘आम्ही फक्त वॉच ठेवू’ असा मिळमिळीत पवित्रा घेतला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने केवळ थातूरमातूर कारवाई करीत या विक्रेत्यांकडून 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

त्वरित कारवाई करा!
वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने बेकायदा मांस विक्री करणाऱया दुकानदारांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना अधिकृतपणे लायसन्स दिल्यास पालिकेच्या तिजोरीत भर पडेल. अनेक ठिकाणी तपासणी न करताच जनावरांची कत्तल केली जाते. ठाणेकरांना दर्जेदार मांस मिळणे आवश्यक असून त्यासाठी आरोग्य विभागाने विशेष काळजी घ्यावी. तसेच चिकन विकणारी बेकायदा 302 दुकाने असून त्याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. – दिलीप बारटक्के, शिवसेना गटनेते.

राज्यात 4 मार्च 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू असला तरी राबोडी येथे असलेल्या पालिकेच्या कत्तलखान्यात 15 खाटिकांना म्हैस व रेडा कापण्याची परवानगी दिली आहे. पशुधन विकास अधिकाऱयांनी प्रमाणित केलेल्या जनावरांचीच फक्त कत्तल होत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी ठाणे महापालिका क्षेत्रात उघडपणे बैलाचे मांस विकणारी 40 हून अधिक बेकायदेशीर दुकाने आहेत. पैकी वागळे इस्टेट मध्ये 2, उथळसरमध्ये 1, कळव्यात 3 व मुंब्य्रात सर्वाधिक 41 दुकाने असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. तसेच नौपाडा, कोपरी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, उथळसर, मानपाडा, मुंब्रा, कौसा येथे शेळ्या, मेंढय़ांचे मांस विकणारी 105 अनधिकृत दुकाने आहेत.

महासभेत सावध पवित्रा
रेडय़ांसारख्या जनावरांची उघडपणे कत्तल होत असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी करताच आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी अतिशय सावध पवित्रा घेतला. मांसाची बेकायदा विक्री होत असल्याची कबुली देतानाच त्यांनी आतापर्यंत 688 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 4 हजार 262 किलो मांस जप्त केले. तसेच 1 लाख 7 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे सांगितले. तर बीफ व मटणाच्या बेकायदा विक्रीवर वॉच ठेवणार असल्याचे नमूद केले. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीही याबाबत तीक्र संताप व्यक्त केला.