
अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रातील विविध गोष्टींवर आवाज उठवत असतो. मनोरंजन क्षेत्रात केलेल्या कामाचा मोबदला न मिळणे ही बाब सामान्य झालेली आहे. मालिकेत काम केल्यानंतर बरेचदा पैसे मिळत नाहीत. हा मुद्दा शशांकने काही वर्षांपूर्वी उचलून धरला होता. नुकतेच शशांकने फेसबुकवर एक पोस्ट करत पुन्हा एकदा मानधन न मिळाल्याच्या मुद्द्याला वाचा फोडली आहे. या पोस्टच्या माध्यमातून शशांक नेमके काय म्हणाला आहे हे जाणून घेऊया.
पोस्टमध्ये शशांक म्हणालाय की, निगरगट्ट् निर्मात्यांच्या कोरड्या थापांचा आता वैताग आलेला आहे. पाच वर्षे उलटून गेल्यानंतरही अजूनही फक्त निव्वळ आश्वासने मिळत आहेत. अशा प्रकारचा आशय शशांकने पोस्टमध्ये लिहिलेला आहे. सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. परंतु या मालिकेतील का केलेल्या कलाकारांना मात्र त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नव्हता.
प्रख्यात दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. परंतु मालिका संपल्यानंतर, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कालांतराने मालिकेतील अभिनेता शशांक केतकर, शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानिस, विजय पटवर्धन, यांसारखे अनेक कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला होता. ही मालिका संपून 5 वर्ष झाली पण अद्यापही कलाकारांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला हा मिळाला नाही.
त्यामुळेच या सर्व गोष्टींमुळे कंटाळून शशांकने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये तो हेही म्हणालाय की, पैसे देण्यासाठी आता 5 जानेवारी 2026 ही तारीख दिलेली आहे. या तारखेला पैसे मिळाले तर, व्हिडीओ टाकून सर्व पुराव्यांसह पैसे मिळाले हे पोस्ट करेन.



























































