
सामना ऑनलाईन । रत्नागिरी
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा डॉक्टर विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटणार आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा देशभरातील डॉक्टरांना मान्य नाही. त्यामुळे डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने २८ जुलै रोजी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनची रत्नागिरी शाखाही सहभागी होणार आहे. शनिवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या बारा तासांत फक्त खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. पराग पाथरे यांनी दिली.
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा गरीब रुग्णांच्या विरोधात असून याबाबत डॉक्टारांची संघटना सरकारसोबत वर्षाहून अधिक काळ चर्चा करता आहे. मात्र सरकारकडून अद्यापही काही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल, खासगी वैद्यकीय कॉलेजवर कोणाचाही धाक राहणार नाही असे संघटनेचे म्हणणे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. यापूर्वी २ जानेवारीला याच मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. पुन्हा एकदा २८ जुलै रोजी डॉक्टर संघटना या विधेयकाच्या विरोधात संपावर जात आहे.
यामध्ये आयएमएने शनिवारी २८ जुलै रोजी १२ तासांचा संप पुकारला आहे. सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत डॉक्टर काम करणार नाहीत. यावेळात फक्त आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती डॉ. पराग पाथरे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. निनाद नाफडे, सेक्रेटरी डॉ. तोरल शिंदे आणि खजिनदार डॉ. सुहृद प्रभुदेसाई यांनी दिली.
































































