
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मलेशिया आणि लगतच्या मलाक्का सामुद्रधुनीजवळील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील ४८ तासांत दक्षिण बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या कमी दाबाची ही स्थिती पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे आणि पुढील २४ तासांत अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भागात प्रथम ती डिप्रेशन मध्ये रूपांतरित होऊ शकते.
IMD च्या उपग्रह विश्लेषणानुसार, दक्षिणकडील अंदमान समुद्र, मलाक्का सामुद्रधुनी आणि जवळपासच्या भागांमध्ये तीव्र ते अति-तीव्र वातावरणीय बदल पाहायला मिळत आहेत. वाऱ्याचा वेग १५-२० नॉट्स असून, ३० नॉट्सपर्यंत त्याचे झोत येत आहेत. तर समुद्रातील परिस्थिती मध्यम राहणार आहे.
IMD ने असेही नमूद केले आहे की, कोमोरीन आणि लगतच्या भागांवर असलेले वरच्या हवेतील चक्रीय अभिसरण २५ नोव्हेंबरच्या आसपास नैऋत्य बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेजवळ नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार करण्याची शक्यता आहे, जे त्यानंतर अधिक गडद होऊ शकते.
‘सेन्यार’ चक्रीवादळ
जर या स्थितीचे चक्रीवादळात रूपांतर झाले, तर त्याला ‘सेन्यार’ हे नाव दिले जाईल. ‘सेन्यार’ या नावाचा अर्थ ‘सिंह’ असा आहे आणि उत्तर हिंदी महासागरासाठी वापरल्या जाणाऱ्या नावांच्या यादीतून हे नाव संयुक्त अरब अमिरातीने (UAE) सुचवले आहे. IMD च्या नियमांनुसार, डिप्रेशनचे रूपांतर जेव्हा चक्रीवादळात होते, तेव्हाच त्याला अधिकृतपणे नाव दिले जाते. ‘सेन्यार’ हे सध्याच्या यादीतील पुढील नाव आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झाल्यावरच हे नाव दिले जाईल.
अतिवृष्टीचा अंदाज
हवामान विभागाने तमिळनाडूमध्ये २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस आणि २४ नोव्हेंबर तसेच पुन्हा २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अति-मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
केरळ आणि माहे येथे २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर लक्षद्वीपमध्ये २४ नोव्हेंबर रोजी मुसळधार सरी येऊ शकतात.
अंदमान आणि निकोबार बेटांवर २५ आणि २९ नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस, तसेच २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान अति-मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. किनारी आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये २९ नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस, त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी अति-मुसळधार पाऊस पडू शकतो.
याशिवाय, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता तमिळनाडूमध्ये २४ ते २८ नोव्हेंबर; केरळ आणि माहेमध्ये २४ ते २६ नोव्हेंबर; लक्षद्वीपमध्ये २४ नोव्हेंबर; आणि किनारी आंध्र प्रदेश व यानाममध्ये २७ व २८ नोव्हेंबर रोजी आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील सहा दिवसांत ४०-५० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे.

























































