कांदा उत्पादक शेतकऱयांना तत्काळ अनुदान द्या!

बाजार समितीत नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये कांदा विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱयांना तत्काळ अनुदान द्यावे अशी मागणी लाभार्थी शेतकऱयांनी केली आहे.

गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कळवण बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक झाली होती.  परिणामी कांद्याचे दर कोसळल्यामुळे त्याचा कांदा उत्पादक शेतकऱयांना फटका बसला होता. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात कांदा विकला गेल्याने शेतकऱयांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश येऊन शासनाने सत्य परिस्थिती जाणून घेत शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान जाहीर केले होते. या अनुदानासाठी  कळवण सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार कळवण तालुक्यात 11 हजार 939 इतके पात्र लाभार्थी ठरले असून त्यासाठी 11 कोटी 6 लाख 30 हजार 934 अनुदान मंजूर झाले होते. पैकी 7 हजार 774 शेतकऱयांना 7 कोटी 55 लाख 46 हजार 840 रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. अजून 981 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱयांना आपले हक्काचे अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील वंचित शेतकऱयांनी केली आहे.

गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कळवण बाजार समितीत उत्पादन खर्चापेक्षा अल्प दरात कांदा विकला होता. त्यामुळे शेतकऱयांना मोठी आर्थिक अडचण सहन करावी लागली होती. नऊ महिने उलटूनही शेतकऱयांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. तत्काळ अनुदान जमा करावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या