केंद्रीय कृषी मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव, महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत लोकसभेत खोटी माहिती दिली

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या प्रश्नावर खोटे उत्तर दिल्याबद्दल शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर राज्यातील 25 खासदारांनी सह्या केल्या आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडय़ात ओमराजे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांच्या मदतीबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्य सरकारने मदतीची मागणी करणारा प्रस्तावच पाठवलेला नाही, असे उत्तर दिले. त्यावरून गदारोळ झाला. प्रस्ताव पाठवल्याचे राज्य सरकारने सांगितल्यानंतर चौहान यांनी आपल्या उत्तरात दुरुस्ती करून 27 नोव्हेंबरला प्रस्ताव आल्याचे सांगितले. ओमराजे यांनी यास आक्षेप घेतला आहे. ‘संसदेच्या सभागृहात मंत्री जे काही सांगतात, ते सत्य असते असे गृहीत धरले जाते, मात्र कृषिमंत्र्यांनी सभागृहाची आणि देशाची दिशाभूल केली, असा आरोप ओमराजे यांनी केला.

अधिवेशन काळात सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मंत्री तासन्तास अधिकाऱयांचे ब्रीफिंग घेत असतात. त्यानंतर उत्तरे देतात. लेखी उत्तरातही अनेकदा दुरुस्ती केली जाते. असे असताना 27 नोव्हेंबरला प्रस्ताव आला असूनही तो आलाच नाही, असे कृषिमंत्री 2 डिसेंबरला कसे सांगू शकतात? अशा प्रकारे मंत्री रेकॉर्डवर खोटे बोलत असतील तर तो खासदारांच्या विशेष अधिकारांच्या हननाचा मुद्दा आहे. त्याच अनुषंगाने मी कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान व राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे, असे ओमराजे यांनी सांगितले.

हक्कभंगाला या खासदारांचा पाठिंबा

ओमराजे यांनी दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावाला अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाक्चौरे, गोवाल पाडवी, शिवाजीराव काळगे, राजाभाऊ वाजे, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, संजय देशमुख, बळवंत वानखेडे, कल्याण काळे, रवींद्र चव्हाण, अमर काळे, प्रशांत पडोले, शामकुमार बर्वे, बजरंग सोनावणे, नीलेश लंके, प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते –पाटील, शोभा बच्छाव, भास्कर भगरे यांच्यासह 25 खासदारांनी पाठिंबा दिला आहे.