राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, शक्ती कायदा तातडीने लागू करा; रोहित पवार यांची मागणी

“महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी आणि शक्ती कायदा तातडीने लागू करावा”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. विधान भवनात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. यार भाष्य करताना ते म्हणाले आहेत की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची 1 लाख 80 हजार हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आहे. परंतु मदत आणि निधी कधी देणार, याबाबत मात्र सरकार बोलायला तयार नाही.” ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना पाणंद रस्ते देऊ, शेतीला दिवसा वीज देऊ, अशा अनेक घोषणा सरकारने निवडणुकीच्या काळात केल्या. पण सध्या गजनी प्रमाणे विसरभोळा कारभार करत विद्यमान सरकार शेतकऱ्याला विसरलं आहे.”

रोहित पवार म्हणाले की, “सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सरकारला विनंती करतो की, आज कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकरी कर्जमाफी आणि इतर कल्याणकारी योजना जाहीर कराव्यात.” शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना 85,00 कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गासाठी खर्च करण्यापेक्षा, सरकारने 25,000 कोटींची कर्जमाफी करावी, जेणेकरून गरिब शेतकऱ्यांना थेट लाभ मिळू शकेल.”