गुणसंपन्न सुपारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> माधव डोळे

आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात सुपारीचे महत्त्व अबाधित आहे. हे तिचे महत्त्व तिच्या औषधी उपयोगांमुळेच असावे.

सुपारी हे संस्कृती, स्नेह आणि मांगल्य यांचं प्रतीक मानलं जातं. विशेषतŠ हिंदू धर्मात सुपारीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. सत्यनारायणाची पूजा, गोंधळ, जागरण, लग्न-मुंज, अभिषेक असो की वास्तुशांती… प्रत्येक धार्मिक कार्यात सुपारी ही हवीच. त्याशिवाय धार्मिक विधी पूर्णच होत नाही. पूजेमध्ये सर्वात पहिला मान असतो तो गणपतीचा. प्रत्येक शुभकार्याचा श्रीगणेशा हा गणपतीच्या पूजनाने होतो. सुपारी हे केवळ फळ नाही, तर त्यास प्रतीकात्मक गणपतीचं रूप मानण्यात येतं. गणपती म्हणून सुपारीचीच पूजा केली जाते. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू या नवग्रहांची पूजा केली जाते तेव्हा चौरंगावर प्रत्येक ग्रहाच्या नावाने एक-एक सुपारी मांडावी लागते. गुढीपाडवा, वटपौर्णिमा, मंगळागौर, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सणवार व उत्सवांमध्ये सुपारीला मानाचे पान आहे. औक्षण करताना तबकामध्ये निरंजन, कुंकू, अक्षता यांबरोबरच सुपारीदेखील ठेवतात. औक्षण करताना सुपारी ओवाळण्याची प्रथा आहे. षोडशोपचार पूजेच्या वेळी घरातील देव्हाऱयात विडा ठेवतात. नागवेलीच्या पानावर अक्षता ठेवून त्यावर एखादे नाणे ठेवले जाते आणि त्या नाण्यावर मोठी सुपारी ठेवतात. हा विडा देव्हाऱयात ठेवताना हा मंत्र म्हटला जातो –

पुगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्
कर्पूरंलालमायुक्तं ताम्बूलं प्रतिगुह्यताम्

संस्कृत ‘शूर्पारक’ या शब्दाच्या अपभ्रंशाने ‘सुपारी’ हा शब्द बनला आहे. सुपारीला पुगीफल किवा पुगफल असेही म्हणतात. पूजेच्या विधीमध्ये सुपारीला महत्त्व तर आहेच, पण त्याशिवाय आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा सुपारी हा अविभाज्य भाग बनला आहे. खेडय़ांमध्ये अजूनही लग्नाची पत्रिका देतानाही एकमेकांना शुभशकुन म्हणून सुपारी देण्याचा प्रघात आहे. साखरपुडय़ाला मंगलविधी म्हणून सुपारीच फोडतात. कोणतीही पूजा ही जोडीने म्हणजे पती-पत्नीने एकत्रपणे बसून करायची असते, पण पत्नी नसल्यास पत्नीचे प्रतीक म्हणून सुपारी कनवटीला बांधून धार्मिक विधी पार पाडला जातो. पूर्वीच्या काळी तर विवाहानंतर नवदांपत्यांना सुपारीचे खेळ खेळायला लावायचे.

रंजक इतिहास
सुपारी देणे याचा अर्थ काहीतरी शुभकार्य आहे असा होतो, पण गुन्हेगारी विश्वात ‘सुपारी’चा अर्थ कुणाचा तरी ‘गेम’करा असा आहे. सुपारीचा इतिहास मात्र मोठा रंजक आहे. इसवी सन पूर्व ३४० मध्ये हिरोडॉटस यांनी
सुपारीचे वर्णन पहिल्यांदा लिहिल्याचा उल्लेख आढळतो. युऑन च्वांग हा चिनी प्रवासी हिंदुस्थानात आला होता तेव्हा त्याला धर्मपाल बोधीसत्त्वाकडून शिधा देण्यात आला होता. त्यात २० सुपाऱयांचादेखील समावेश होता. ‘सु’ अधिक ‘पारी’ या दोन शब्दांच्या संयोगाने ‘सुपारी’ हा शब्द तयार झाला आहे. याचा अर्थ चांगला गर असलेले फळ असा होतो. संस्कृत शूर्पारक शब्दाच्या अपभ्रंशाने ‘सुपारी’ शब्द बनला असावा असल्याचे सांगतात. हिंदुस्थानात सुपारीची प्रथम लागवड ठाणे जिह्यातील नालासोपारा येथे झाली. बंगाल, कारवार, रत्नागिरी, रायगड, केरळ, तामीळनाडू, गोवा येथे सुपारीची लागवड होते. हिंदुस्थानातून नेपाळ, केनिया, सौदी अरेबिया अशा
अनेक देशांमध्ये सुपारीची निर्यात केली जाते. देव्हाऱयापासून पानाच्या टपरीपर्यंत मोठय़ा दिमाखात वावरणारी ही सुपारी म्हणजे मूर्ती लहान व कीर्ती महान आहे. संस्कृत श्लोकांपासून ते लावणीपर्यंत सुपारी व पानानं लज्जत आणली आहे. एका लावणीत म्हटलंय…नटले तुमच्यासाठी…राजसा विडा रंगला ओठी…

औषधी उपयोग
– सुपारी भाजून खाल्ली तर मोडशी बंद होते.
– ओली सुपारी दुधाबरोबर घेतल्यास कृमी मरतात.
– मूत्र विकारांवरही सुपारी अतिशय गुणकारी आहे.
– सुपारीमध्ये अँटिऑक्सिडेंट द्रव्य असते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
– सुपारी जाळून दंतमंजनही काही ठिकाणी तयार केले जाते.
– सुपारीचे अनेक औषधी उपयोग असले तरी तिचे अति सेवन हानिकारकच. त्याचं व्यसनात रूपांतर झालं तर कॅन्सरचाही धोका असतो.
– आयुर्वेदात तांबूल सेवनालाही महत्त्व आहे. पान कोलकाता असो की बनारसी, त्यात सुपारी हवीच.