
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी होणाऱया मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधीच धाराशिवमध्ये भाजप आणि शिंदे गटात धुसफूस पाहायला मिळत आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काही जुन्या वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेत भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सावंत यांच्या विरोधात टीकेची मोहीम उघडली आहे. हाफकीन कोण आह, असा प्रश्न आरोग्यमंत्री असताना सावंत यांनी विचारला होता. तसेच महाराष्ट्राला भिकारी करीन, पण मी भिकारी होणार नाही, या वादग्रस्त विधानाचा उल्लेख राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर विचारला जात आहे.
पुणे-पिंपरीत महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी
राज्यात सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. नेत्यांमध्ये खडाजंगी होत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पुणे महापालिकेतील कोटय़वधी रुपयांच्या ठेवी मोडल्याचा आरोप अजित पवार यांनी भाजपवर केला आहे. महायुतीतील भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षातील नेते राज्यातील सत्तेसाठी एकत्र आणि महापालिकेतील सत्तेसाठी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
पती काँग्रेसकडून, तर पत्नी राष्ट्रवादीकडून रिंगणात
चंद्रपुरात एकाच पुटुंबात पती आणि पत्नी असे दोघेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चंद्रपुरातील एमईएल प्रभागातील 3 मधून काँग्रेसच्या तिकिटावर लोमेश उईके हे निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष असलेल्या बेबीताई उईके या याच प्रभागातील दुसऱया जागेवर निवडणूक लढवत आहेत. पती-पत्नी दोघे एकाच घरात राहत असून निवडणूक मात्र दोन वेगवेगळ्या पक्षाकडून लढवत आहेत. निवडणुकीसाठी आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीमुळे आमच्या पुटुंबावर कोणताही परिणाम होत नाही, असे या दोघांनी म्हटले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला लावली इलेक्शन डय़ुटी
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सेवानिवृत्त झालेल्या मूलचंद आलासिंग राठोड या कर्मचाऱ्याला चक्क इलेक्शन डय़ुटी लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राठोड हे 31 जुलै 2025 रोजी सेवेतून निवृत्त झाले आहे. तरीही निवडणूक अधिकारी इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे या कर्मचाऱयाविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकारानंतर निवृत्त कर्मचाऱयाने थेट मनपा आयुक्तांना पत्र पाठवून हा सर्व प्रकार सांगितला. गुन्हा दाखल केल्याने माझी बदनामी झाली आहे. माझ्या जिवाला काही धोका निर्माण झाल्यास याला संबंधित यंत्रणा जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे.



























































