50 वर्षांचा कलाप्रवास उलगडणार, छायाचित्रकार रमेश करमरकर यांचे वरळीत ‘भरारी’ प्रदर्शन
प्रसिद्ध फोटोग्राफर रमेश करमरकर यांच्या फोटोंचे पहिले प्रदर्शन येत्या 13 ते 19 ऑगस्टदरम्यान वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. ‘भरारी’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. यामध्ये रमेश करमरकर यांनी देशविदेशात फिरून काढलेली निसर्ग छायाचित्रे पाहावयास मिळतील. यासोबतच आर्किटेक्चरल, वेग आणि मूड्स अशा विविध श्रेणींतील छायाचित्रे असतील. अभिनेत्री अदिती सारंगधर हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
शीव-चुनाभट्टी येथील रमेश करमरकर 50 हून अधिक वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही ते फोटोग्राफीच्या पॅशनने झपाटून कामाला लागतात. अलीकडेच त्यांनी भिगवन-पुणे येथे जाऊन तिथला निसर्ग, पक्षी कॅमेऱ्यात टिपले. इंग्लंड, ब्राझील, दुबई, पॅनडा, अॅमस्टरडॅम येथील ‘करमरकर टच’ असलेले फोटोही प्रदर्शनात असतील. ‘भरारी’ प्रदर्शनात हे पह्टो पाहावयास मिळतील. हे प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत निःशुल्क पाहता येईल.
‘एक्स’चे पहिले कार्यालय होणार बंद
सध्याच्या सोशल मीडिया जमान्यात ‘एक्स’ (ट्विटर) खूप लोकप्रिय आहे. जगभरातील सेलिब्रेटी, उद्योजक आपले मत मांडण्यासाठी ‘एक्स’चा वापर करतात. ‘एक्स’ची सुरुवात 2006 साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातून झाली होती. या कार्यालयाला आता टाळे ठोकले जाणार आहे. एलन मस्क यांनी हा निर्णय घेतलाय. या कार्यालयात ट्विटरची भरभराट झाली होती.
बांगलादेशात हिंदूंची घरे तोडली, मंदिरांची नासधूस
बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. हसीना यांनी देश सोडताना बांगलादेशात उद्रेक सुरू झालाय. बांगलादेशींनी हिंदू धर्मीयांना लक्ष्य केले. 5 ऑगस्ट रोजी हिंदूंची घरे जाळण्यात आली. लूटमार आणि मंदिरांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिथल्या 27 जिह्यांमधील हिंदू लोकांच्या घरांवर हल्ले झाले.
ब्रिटनला जाणाऱ्यांसाठी अधिसूचना जारी
ब्रिटनला जाणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी हिंदुस्थानी उच्चायोग यांनी एक अधिसूचना जारी केली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात तीन मुलींची चापू भोसकून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण ब्रिटनमध्ये हिंसक आंदोलन केले जात आहे. त्यामुळे ब्रिटनला जात असाल तर अलर्ट रहा आणि सावधगिरी बाळगा, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
डिझेल कारपेक्षा सीएनजी कारची जादा विक्री
देशात पहिल्यांदा सीएनजी कारची डिझेल कारच्या तुलनेत जास्त विक्री झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत ग्राहकांनी सीएनजी कारला जास्त पसंती दर्शवली आहे. या तिमाहीत 10.3 लाख वाहनांची विक्री झाली असून यात 1 लाख 88 हजार 868 म्हणजेच 18.41 टक्के वाहने ही सीएनजीची आहेत. राजस्थान, कर्नाटकसह पाच राज्यांत विक्री वाढली.