महत्त्वाचे – कांदिवलीत पोलिसांना धक्काबुक्की  

कांदिवलीत पोलिसांना धक्काबुक्की

नाकाबंदीत पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याची घटना कांदिवली पूर्व परिसरात घडली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी रात्री समता नगर पोलिसांचे विशेष पथक आकुर्ली रोड येथे नाकाबंदीला होते. नाकाबंदीदरम्यान एक जण दारू पिऊन वाहन चालवत असताना दिसून आला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात येत होती. तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. त्यांच्यावरदेखील कारवाई करू नये म्हणून त्याने पोलीस पथकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

एलएलएमच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान

शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या शिव विधी व न्याय सेनातर्फे सोमवार, 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत शिवसेना भवन येथे एलएलएम प्रवेश परीक्षेस बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान निःशुल्क असून केवळ विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आहे. या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनावणे आहेत.

म्हाडाचा लोकशाही दिन 15 सप्टेंबरला

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) तेरावा लोकशाही दिन सोमवार, 15 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपासून ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. म्हाडा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या दुसऱया सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.