सुनबाईला पोटगी देण्याचे सासूला आदेश; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मुंबईतील न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

सर्वसामान्यपणे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांत विवाहितेला पतीकडून पोटगी मिळते. मात्र मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात चक्क सूनबाईला सासूकडून पोटगी मिळवून दिली आहे. अर्जदार महिलेच्या पतीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा छळ केला. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि सध्या सासरच्या घरापासून अलिप्त राहत असलेल्या महिलेला पोटगी मंजूर केली. अर्जदार महिलेला तिच्या सासू आणि दोन दिरांनी दरमहा 9 हजार रुपयांचा देखभाल खर्च द्यावा, असा महत्वपूर्ण आदेश बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.

मालाड पश्चिमेकडील अमरपाली घागरे या महिलेने कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण आणि पोटगी मागत न्यायालयात दाद मागितली होती. तिने छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या सासूसह दोन दिरांविरोधात 2005 च्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयात अर्ज केला होता. तिचे 18 एप्रिल 2004 रोजी लग्न झाले होते. दुर्देवाने 12 जानेवारी 2018 रोजी पतीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला अधिकच त्रास देणे सुरु केले होते. दोन दिरांनी अनेकदा मारहाणही केली. अखेरीस तिला तीन मुलांसह घराबाहेर काढले होते.

अर्जदार महिलेच्या बाबतीत घडलेले सर्व प्रकार कौटुंबिक हिंसाचाराच्या कक्षेत मोडत असल्याचे निरिक्षण नोंदवत बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने महिलेच्या सासूसह दोन दिरांना चांगलाच दणका दिला.

प्रतिवादी सासू, दिरांनी अर्जदार महिला व तिच्या तीन मुलांना कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नये. तसेच अर्जदार महिलेला 8 जानेवारी 2020 रोजी अर्ज केल्याच्या तारखेपासून दरमहा 9 हजार रुपयांचा कायमस्वरुपी देखभाल खर्च द्यावा, त्याचबरोबर दरमहा 5 हजार रुपये घरभाडे द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने पहिल्यांदाच अशाप्रकारे निकाल दिला आहे. सूनेचा छळ करणाऱ्या महिलांना न्यायालयाच्या या निकालामुळे जरब बसेल, अशी प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.