
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियावर अप्रत्यक्ष दबाव आणण्याच्या हेतूने हिंदुस्थानवर आर्थिक निर्बंध लादले आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दिली. या निर्बंधांचा भाग म्हणून हिंदुस्थानवरील आयात शुल्क 25 टक्क्यांवरून दुप्पट करून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे, जे 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत बोलताना लेविट म्हणाल्या, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी प्रचंड दबाव टाकला आहे. हिंदुस्थानवर निर्बंध आणि इतर काही कृती यासारख्या पावलांद्वारे त्यांनी आपले ध्येय स्पष्ट केले आहे. युद्ध त्वरित संपवण्यासाठी ते कोणत्याही विलंबाच्या विरोधात आहेत.”
दरम्यान, नुकतीच ट्रम्प यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत युद्ध संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह त्रिपक्षीय चर्चेची शक्यता व्यक्त करण्यात आली. ट्रम्प यांनी या बैठकीला अत्यंत यशस्वी बैठक म्हटले आहे. याबद्दल बोलताना लेविट यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी युरोपीय नेत्यांसोबतही चर्चा केली आहे. पुतिन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर 48 तासांच्या आत युरोपीय नेते आणि नाटोचे सरचिटणीस व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते, ज्याला त्यांनी महत्त्वाचे पाऊल मानले आहे.