
अमेरिकेच्या मदतीनेच पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये जिहादींना प्रशिक्षण दिले, अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दिली असून अफगाणिस्तानमधील दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेला मदत करून घोडचूक केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच जर 9/11च्या हल्ल्यानंतर दहशतवादविरोधात अमेरिकेने पुकारलेल्या शीत युद्धात सहभागी झालो नसतो तर कदाचित आज असुरक्षित देशांच्या यादीत पाकिस्तानचे नाव नसते, असेही खान यांनी म्हटले आहे.
रशिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत खान यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. अफगाणिस्तानमधून दहशतवादाचे उच्चाटन करण्यास अमेरिकेला अपयश आले. पण अमेरिकेने त्याचे खापर पाकिस्तानवर फोडले, जे योग्य नाही, असे खान यांनी म्हटले. त्याचबरोबर शीत युद्धात अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत संघाविरोधात लढण्यास पाकिस्ताननेच जिहादी तयार केले त्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यासाठी अमेरिकेनेच फंडिंग दिल्याची कबुली खान यांनी या मुलाखतीत दिली. तसेच नंतर याच जिहादींना अमेरिकेने दहशतवादी घोषित केले हा विरोधाभास असल्याचे खान म्हणाले. जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानमध्ये तालिबानी विरोधात कारवाई करण्यास उतरली तेव्हा पाकिस्तानने तटस्थ राहायला हवे होते. अफगाण य़ुद्धात सहभागी झाल्यामुळेच सगळा समूदायच आमच्या विरोधात गेल्याचेही खान यावेळी म्हणाले.
या युद्धात पाकिस्तानच्या 70,000 लोकांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर 100 अरब डॉलरचा फटकाही बसला. पण शेवटी अफगाणिस्तानमध्ये अपयशी ठरल्याचे खापर अमेरिकेवर नाही तर पाकिस्तानवर फोडले गेले. हा पाकिस्तानवर अन्याय असल्याचे खान यांनी म्हटले.






























































