40 हजार सशस्त्र दहशतवादी अजूनही पाकिस्तानात! इम्रान खान यांची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,वॉशिंग्टन

पाकिस्तानात 30 हजार ते 40 हजार सशस्त्र दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांना हल्ल्याचे ट्रेनिंग दिलेले आहे. कश्मीर किंवा अफगाणिस्तानात हे दहशतवादी हल्ले करतात, अशी स्पष्ट जाहीर कबुलीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात दिली आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या कबुलीनाम्यामुळे पाकिस्तान हेच दहशतवाद्यांचे नंदनवन आहे हा हिंदुस्थानचा दावा खरा असल्याचेच स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थानची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कम झाली आहे.

इम्रान खान तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकन काँग्रेसच्या शील जॅक्सन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात थिंक टँकसमोर बोलताना इम्रान खान यांनी पाकिस्तान हे दहशतवादी पोसणारे राष्ट्र असल्याचेच अप्रत्यक्षरीत्या कबुल केले आहे.

काय म्हणाले इम्रान खान?

  • गेली 15 वर्षे पाकिस्तानातील सरकारांनी अमेरिकेला सत्य सांगितले नाही. अमेरिकेपासून वस्तुस्थिती लपवून ठेवली. अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्धात पाकने भाग घेतला. मात्र, अमेरिकेला आम्ही सत्य माहिती देवू शकलो नाही. यासाठी मी आमच्या सरकारांनाच जबाबदार धरतो
  • पाकिस्तानात 40 दहशतवादी गट गेली 15 वर्षे कार्यरत होते. आताही 30 हजार ते 40 हजार सशस्त्र दहशतवादी पाकमध्ये आहेत. या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलेले आहे. काश्मिर आणि अफगाणिस्तानात हल्ले करीत आहेत.
  • आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा पाकिस्तानात दहशतवाद्यांविरूद्ध मोहिम उघडली आहे.
  • अफगाणिस्तानातील लढाईत अमेरिकेच्या बाजूने पाकिस्तान लढत होते. अमेरिका आमच्याकडून आणखी मदत मागत होती. पण त्यावेळी पाकिस्तान आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करीत होता.

हिंदुस्थानची बाजू आणखी भक्कम

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे नंदनवन बनले आहे. पाकमधील लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना जम्मु-कश्मिरात हल्ले करीत असल्याचे पुरावे अनेकदा हिंदुस्थानने दिले आहे. मात्र, पाकिस्तान आजवर हात झटकत होते. आता खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनीच कबुलीनामा दिल्यामुळे पाकडय़ांचा खोटारडेपणा जगापुढे आला आहे. हिंदुस्थानची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी भक्कम झाली आहे.

9/11 च्या हल्ल्याशी पाकचा संबंध नाही?

अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी पाकचा संबंध नाही असा दावा इम्रान खान यांनी यावेळी केला. अल-कायदा अफगाणमध्ये आहे. तालिबानी दहशतवादी पाकमध्ये नाहीत असे ते म्हणाले.