इम्रान यांच्या राजवटीत हिंदूंवर अत्याचार वाढले, संयुक्त राष्ट्र आयोगाचा अहवाल

601

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या राजवटीत धर्माच्या नावावर हिंदू समाजातील लोकांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर अत्याचार वाढलेत, असे संयुक्त राष्ट्र आयोगाने म्हटले आहे. हिंदूंसोबतच येथील ख्रिश्चनांचीही स्थिती खराब असल्याचे आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही समाजांमधील महिला व मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केले जात आहे. ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे सरकार पाकिस्तानात आले आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे आयोगाने आपल्या ‘कमिशन ऑफ वुमेन’ नावाच्या 47 पानी अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानात इशनिंदा आणि अहमदियाविरोधी कायद्याच्या वाढत्या प्रस्थाबाबतही आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. कुणावरही इशनिंदा विरोधी कायदा लावून अपराधी बनविले जात आहे. या कायद्यांचा वापर हिंदूंना त्रास देण्यासाठी केवळ हत्याराप्रमाणे केला जातोय असेही आयोगाचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समाजाचा छळ सुरू असून त्यांना सक्तीने धर्मांतर करायला भाग पाडले जाते. हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मांतर याचे प्रमाण मोठे असल्यामुळे हिंदू समाज मोठय़ा मानसिक तणावात जगत आहे.

हिंदूंवरील हल्ले सुरूच
पाकिस्तानातील पोलीस आणि न्याय व्यवस्थेवरही संयुक्त राष्ट्र आयोगाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अपहरण करण्यात आलेल्या महिलांसमोर पोलिसांची मोठी समस्या उभी राहते. कारण पोलीस त्यांची दखलच घेत नाहीत. त्यातूनही पोलिसांनी या महिलांच्या तक्रारींकडे लक्ष दिलेच तरी न्याय व्यवस्थेकडून या महिलांना न्याय मिळण्याची सूतराम शक्यता नसते. पोलीस आणि न्यायव्यवस्थेच्या या भेदभावपूर्ण धोरणामुळे पाकिस्तानात हिंदूंवरील हल्ले सुरूच आहेत असे आयोगाने नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या