इम्रान खान यांची नवी नौटंकी, कश्मिरींसाठी करणार ‘पीओके’मध्ये रॅली

आंतरराष्ट्रीय पातळीवर कश्मीरवरून समर्थन मिळत नसल्यामुळे आता पाकव्याप्त कश्मीरमध्येच रॅली काढून आम्ही कश्मिरींबरोबर असल्याची नवी नौटंकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान करणार आहेत. पीओकेमध्ये 13 सप्टेंबरला रॅली काढून जगाचे लक्ष पुन्हा कश्मीरच्या मुद्दय़ावर वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न इम्रान खान करणार आहेत.

पीओकेची राजधानी असलेल्या मुजफ्फराबादमध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. ट्विटरमध्ये त्यांनी कश्मीरचा उल्लेख हिंदुस्थानी हद्दीतील कश्मीर असा केला आहे. हिंदुस्थानी सैन्याचा कश्मिरींवर होत असलेला अन्याय आणि कश्मिरींबरोबर आम्ही सदैव आहोत, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे.

7 दहशतवादी तळ, 275 दहशतवादी सक्रिय
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानने पुन्हा 7 दहशतवादी तळ (लॉन्चिंग पॅड) सुरू केले असून घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांसाठी 275 दहशतवादी सक्रिय केले असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांबरोबर अफगाणी आणि पश्तूनमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या आधी 1990 सालीही पाकिस्तानने दहशतवादासाठी अफगाणी आणि पश्तून तरुणांचा वापर केला आहे.

कर्बालाचा दाखला देत चिथावणी
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानी नेत्यांनी हिंदुस्थानविरोधात सर्वच पातळीवर पोकळ धमक्या दिल्या. गझनवीची चाचणी करून जगाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची डाळ शिजली नाही. त्यामुळे आता रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीसाठी कर्बालाचा दाखल देत इम्रान खान यांनी कश्मिरींना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कर्बलाचा संदेश लक्षात ठेवा आणि अन्यायासमोर कधीही झुकू नका. अन्यायाविरोधात लढा,’ असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या