इमरान खानचा चिथावणीखोर निर्णय; 14 ऑगस्टला POK च्या विधानसभेला करणार संबोधित

3406

हिंदुस्थानशी व्यापार बंद करण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानने पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान पुरता हादरला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून आत्मघातकी निर्णय घेण्यात येत आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आणखी एक चिथावणीखोर निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी 14 ऑगस्टला इमरान खान पाकव्याप्त कश्मीरचा दौरा करणार आहेत. पाकव्याप्त कश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये ते विधानसभेला संबोधित करणार आहेत. तसेच पाकव्याप्त कश्मीर आणि जम्मू कश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या समर्थनासाठी पाकिस्तानकडून अनेक रॅली आयोजित करण्यात येत आहेत.

इमरान खान यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी पाकव्याप्त कश्मीरमधील नागरिकांच्या स्वातंत्र्याचा ढोल पाकिस्तान बडवत आहे. कश्मीरी नागरिकांच्या हक्कासाठी या रॅली आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुझफ्फराबादमध्ये हिंदुस्थानविरोधी रॅलीही आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत बुरहान वाणी आणि यासीन मलीकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येण्याची शक्यता आहे. इमरान खान यांच्यासोबत या दौऱ्यात काही मंत्रीही सहभागी होणार आहेत. इमरान सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार असून तेथील विधानसभेलाही संबोधित करणार आहेत. हिंदुस्थान कश्मीरी जनतेवर दडपशाही करत असल्याचा कांगावा पाकिस्तान करत आहे. हिंदुस्थानने जम्मू कश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात 14 ऑगस्टला ‘कश्मीर एकजूट दिन’ पाळण्याचे तर 15 ऑगस्टला ‘काळा दिन’ पाळण्याचे आवाहन पाकिस्तानने केले आहे. त्यासाठी ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ असे वादग्रस्त लोगोही बनवण्यात आले आहेत.

इमरान यांच्या या निर्णयामुळे पाकव्याप्त कश्मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात अनेकदा आंदोलने करण्यात आली आहे. तसेच हिंदुस्थानने घेतलेल्या निर्णयानंतर गिलगीट- बाल्टिस्थानने हिंदुस्थानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच बलुचिस्ताही अशांत असून तेथेही पाकिस्तानविरोधात आंदोलने होत आहेत. त्यामुळे इमरान यांच्या निर्णय पाकिस्तानच्याच अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या