
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर, त्यांच्या तीन बहिणींनी तुरुंगात असलेल्या भावाला भेटण्याची मागणी केली आहे. खान यांच्या बहिणी नोरिन खान, अलीमा खान आणि उझमा खान यांनी या आठवड्यात रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर एकत्र येत खान यांना भेटण्याची परवानगी मागितली. यावेळी त्यांना आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या समर्थकांना पोलिसांनी ‘क्रूरपणे मारहाण’ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
2023 पासून अदियाला तुरुंगात असलेल्या खान यांना तीन आठवड्यांहून अधिक काळ भेटण्याची परवानगी मिळालेली नाही, अशी तक्रार त्यांच्या बहिणींनी केली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या त्यांच्या पक्षाने ‘इम्रान खान यांना भेटण्याची मागणी केल्याबद्दल बहिणींवर हल्ला झाल्याचे’ म्हटले आहे आणि या घटनेचा निषेध करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
बहिणींचा पोलिसांवर गंभीर आरोप
पंजाबचे पोलीस प्रमुख उस्मान अन्वर यांना लिहिलेल्या पत्रात खान यांच्या बहिणींनी म्हटले आहे की, हा हल्ला म्हणजे ‘क्रूर आणि पूर्वनियोजित कारवाई’ होती. नोरिन नियाझी यांनी आरोप केला की, ते शांततापूर्ण आंदोलन करत असताना, कोणतीही सूचना न देता पथदिवे बंद करण्यात आले आणि त्यानंतर पंजाब पोलिसांनी हल्ला केला.
नोरिन नियाझी यांनी सांगितले की, ७१ वर्षांच्या वयात त्यांना केसांनी धरून जमिनीवर फेकण्यात आले आणि रस्त्यावरून फरपटले गेले, ज्यामुळे त्यांना जखमा झाल्या. तुरुंगाबाहेर उपस्थित असलेल्या इतर महिलांनाही मारहाण आणि फरफट केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पोलिसांचे हे वर्तन गंभीर असून तो लोकशाहीच्या मूलभूत कर्तव्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. बहिणींनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
खान एकांत कारावासात
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख असलेले इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून अनेक खटल्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांदरम्यानही, त्यांच्या भेटींवर एका महिन्याहून अधिक काळ अघोषित बंदी आहे.
PTI नुसार, खान संपूर्ण एकांतवासात आहेत. त्यांच्या कायदेशीर टीमच्या एका वकिलाने सांगितले की, त्यांना पुस्तके, आवश्यक वस्तू आणि वकिलांना भेटण्याची संधी देखील रोखली जात आहे. या स्थितीवर टिप्पणी करताना त्यांनी ‘येथे जंगलाचा कायदा चालतो’ असे म्हटले. खैबर-पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनाही सात वेळा प्रयत्न करूनही खान यांना भेटण्याची परवानगी मिळाली नाही.



























































