
गद्दारांमध्ये स्वतः निवडून येण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते निवडणुका लावण्याचे धाडस करीत नाहीत. त्यांना माहिती आहे, कितीही खोके बोके आले तरी अणुशक्तीत शिवशक्ती आणि भीमशक्तीच असणार आहे. मुंबईला पंगाल करणाऱयांचा सुपडा साफ होणार आहे, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज देवनार येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात केला. या मेळाव्याला हजारो शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. मैदान गर्दीने तुडुंब भरले होते.
शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या माध्यमातून देवनार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चंदन लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेला गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांचा मेळावा आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील ईडी सरकारवर सडकून टीका केली. 1997 साली मुंबई महापालिका फक्त 600 कोटी रुपये नफ्यात होती. त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईकरांच्या पैशाची साठवणूक झाली. त्यामुळेच पालिका आज 90 हजार कोटी रुपये नफ्यात आली आहे. शिवसेनेने पै न् पै वाचवलेल्या याच पैशांवर गद्दारांचा डोळा आहे. त्यामुळेच ते निवडणुका लावत नाहीत. सुशोभीकरणाच्या नावाखाली ठिकठिकाणी डिस्को लाईट लावणे याला विकास म्हणत नाहीत. हा विकास फक्त ठेकेदार आणि गद्दारांची घरे भरण्यासाठी आहे, अशी तोफही आदित्य ठाकरे यांनी डागली.
याप्रसंगी शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभाग संघटक रिता वाघ, उपविभागप्रमुख गोपाळ शेलार, माजी आमदार तुकाराम काते, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, माजी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, स्मिता गावकर, श्रीकांत शेटे, माजी नगरसेविका समृद्धी काते, निधी शिंदे, ऋतुजा तारी, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, रामदास कांबळे, अरुण उन्ने, सुप्रदा फातर्पेकर, अंजली नाईक आदी उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन निमेष भोसले यांनी केले.
बजेटमध्ये महाराष्ट्र दिसला नाही
गद्दार आणि त्यांचे पाठीराखे मुंबईकडे कमाईचे साधन म्हणून पाहत आहेत. त्यांना फक्त मुंबई आणि महाराष्ट्राला कंगाल करायचे आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कुठेच दिसला नाही. जिकडे निवडणुका आहेत त्या राज्यांवर निधीची खैरात करण्यात आली आहे. लोकशाही टिकण्यासाठी आपल्याला आता आरपारची लढाई लढावी लागणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.


























































