
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात आणि परिसरात शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या दर्शनाने प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, वन विभाग आणि रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने आणि तब्बल ५ तासांच्या अथक परिश्रमानंतर या बिबट्याला सुखरूप जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेत बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही. जालना उत्तर प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या भोकरदन नियतक्षेत्रातील धावडा गावालगत आज, २७ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या आल्याची माहिती गावकर्यांना मिळाली. बिबट्या गावात शिरल्याच्या भीतीने परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच भोकरदनचे वनरक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना याची कल्पना दिली. माहिती मिळताच जालना उत्तर प्रादेशिकच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नीता फुले या आपल्या संपूर्ण फौजफाट्यासह आणि रेस्क्यू टीमसह घटनास्थळी हजर झाल्या. रेस्क्यू टीमचे तज्ज्ञ आशिष जोशी आणि दीपक वटाणे यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी तातडीने सूत्रे हलवली. हा बिबट्या मानवी वस्तीजवळ असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु, वन विभागाने अतिशय शांततेने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली.
५ तास चालला थरार; बिबट्या सुरक्षित!
गावकर्यांची झालेली गर्दी आणि बिबट्याचा वाढलेला वावर यामुळे हे ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक होते. अखेर तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, बिबट्याला कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात यश आले. बिबट्या जेरबंद होताच धावडा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.


























































