गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात डिजिटल जाहिरातींचे शुल्क माफ; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश 

मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांकडून लावण्यात येणाऱया डिजिटल जाहिरातींचे शुल्क माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही जारी केले आहे. हे शुल्क माफ करावे, यासाठी शिवसेना विधिमंडळ गटनेते आमदार अजय चौधरी यांनी पालिका उपायुक्तांकडे (विशेष) पाठपुरावा केला होता. त्यामुळे मुंबईतील सर्व गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनानंतर सरसकट सर्वच क्षेत्रात डिजिटल जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे. कोरोनानंतर मुंबईतील काही मोजकी गणेश मंडळे सोडली तर बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्या पार्श्वभूमीवर,  गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांच्या डिजिटल जाहिरातींचे शुल्क माफ करावे, यासाठी आमदार अजय चौधरी यांनी पालिका उपायुक्तांकडे (विशेष) पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जनहिताचे, आरोग्यविषयक आणि व्यावसायिक जाहिराती 10 बाय 10 च्या स्क्रीनवरून प्रदर्शित करायला महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी परवानगी दिली आहे.