कोल्हापुरात शाळेच्या आवारातच शिक्षकावर खुनी हल्ला

शाळेच्या आवारातच एका शिक्षकावर खुनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील कदमवाडी येथील शाळेत ही घटना घडली आहे. या घटनेत शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी संशयित हल्लेखोरांची नावे समोर आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संजय आनंदा सुतार (वय 45, रा. वरणगे-पाडळी, ता. करवीर) असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. कदमवाडी येथील संस्कार शिक्षण मंडळाच्या ‘माझी शाळा’मधील शिक्षक संजय सुतार यांना दुपारी एकच्या सुमारास शाळेच्या सुट्टीत काही तरुणांनी शाळेबाहेर बोलावून घेतले. शाळेच्या बोळातच त्यांच्यावर धारदार शस्त्र्ााने वार करून हे तरुण पळून गेले. शिक्षकावर शाळेच्या आवारातच खुनी हल्ला झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी सुतार यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुतार यांच्यावर डोके, मान आणि छातीवर आठ वार झाले आहेत. त्यांच्या जबाबातून संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, हल्लेखोर सापडल्यानंतरच या हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होणार असल्याचे शाहूपुरी पोलिसांकडून सांगण्यात आले.