गेल्या 30 वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे हिंदुस्थानात 80 हजार जणांचा मृत्यू, कोट्यवधी लोक प्रभावित

गेल्या तीन दशकांमध्ये नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांच्या यादीत हिंदुस्थानचा नववा क्रमांक लागला आहे. या काळात जवळपास 430 तीव्र नैसर्गिक घटनांमुळे 80,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असे एका नव्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पर्यावरणविषयक थिंक टँक जर्मनवॉच यांनी ब्राझीलमधील बेलेम येथे झालेल्या COP30 परिषदेत मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्स (CRI) 2026 नुसार, 1995 ते 2024 दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे 1.3 अब्ज लोक प्रभावित झाले आणि जवळपास 170 अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाले.

अहवालानुसार, हिंदुस्थानतील बहुतांश नुकसान पुनःपुन्हा येणाऱ्या पूर, चक्रीवादळे, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांमुळे झाले आहे, ज्यांची तीव्रता जागतिक तापमानवाढीमुळे वाढली आहे.

1998 मधील गुजरात चक्रीवादळ, 1999 मधील ओडिशा सुपर सायक्लोन, 2013 मधील उत्तराखंड पूर आणि अलीकडच्या घातक उष्णतेच्या लाटा या हिंदुस्थानच्या उच्च क्रमांकासाठी जबाबदार ठरलेल्या काही प्रमुख घटनांचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

अहवालात नमूद केले आहे की, हिंदुस्थानची मोठी लोकसंख्या आणि मान्सूनमधील अनिश्चितता यामुळे देश विशेषतः असुरक्षित आहे, कारण दरवर्षी कोट्यवधी लोकांना तीव्र नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो.

फक्त 2024 मध्येच हिंदुस्थानत अतिवृष्टी आणि अचानक आलेल्या पुरांमुळे ८० लाख लोक प्रभावित झाले, विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार, मागील वर्षी जागतिक पातळीवर पूर आणि वादळे ही सर्वात विध्वंसक आपत्ती ठरली. जर्मनवॉचने म्हटले आहे की 1995 ते 2024 दरम्यान जगभरात 9,700 हून अधिक तीव्र नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या, ज्यात 8.3 लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले, 5.7 अब्ज लोक प्रभावित झाले आणि सुमारे 4.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलरचे थेट आर्थिक नुकसान झाले.

मागील तीन दशकांत सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये डॉमिनिका पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर म्यानमार, होंडुरस, लिबिया, हैती, ग्रेनेडा, फिलिपाईन्स, निकाराग्वा, हिंदुस्थान आणि बहामास यांचा क्रम लागतो.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 2024 मध्ये एल निनोच्या स्थितीमुळे हवामान पद्धतींवर परिणाम झाला असला तरी, मानवनिर्मित हवामान बदलाने उष्णतेच्या लाटा, वादळे आणि पूर यांची तीव्रता वाढवण्यात निर्णायक भूमिका बजावली.

वैज्ञानिक अभ्यासांनुसार, हवामान बदलामुळे अनेक आपत्ती अधिक शक्य आणि अधिक तीव्र झाल्या आहेत, विशेषतः दीर्घकाळ चालणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या लाटा, ज्यांचा परिणाम अब्जावधी लोकांवर झाला.

अहवालात इशारा देण्यात आली आहे की अशा वारंवार घडणाऱ्या आपत्ती आता हिंदुस्थानसह अनेक विकसनशील देशांसाठी “नवीन सामान्य बाब” बनत आहेत, त्यामुळे तातडीच्या आणि पुरेशा निधी असलेल्या अनुकूलन उपायांची गरज आहे.

अहवालात म्हटले आहे की, वारंवार होणारे नुकसान सार्वजनिक वित्तीय व्यवस्था आणि समुदायांची पुनर्बांधणी क्षमता दोन्ही कमकुवत करते, ज्यामुळे अनेक लोक आणखी दारिद्र्यात ढकलले जातात.