स्थानिकच्या निवडणुकीत छोट्या पक्षांची गोची, महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांनाच राखीव निवडणूक चिन्ह; प्रत्येक वॉर्डात वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगानेही चिन्हे वाटप केली आहेत. पण त्यात छोट्या पक्षांची गोची होणार आहे. केवळ मोजक्याच पक्षांना राखीव निवडणूक चिन्ह मिळाले असून इतर पक्षांना प्रत्येक वॉर्डात वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसणार आहे

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेत एकूण 435 राजकीय पक्षांची यादी देण्यात आली आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व अन्य अशा 13 प्रमुख पक्षांना त्यांची पारंपारिक निवडणूक चिन्हे मिळाली आहेत.

194 मुक्त चिन्हे उपलब्ध

निवडणूक आयोगाकडे 194 मुक्त चिन्हे उपलब्ध आहेत. त्यात एअर पंडिशनर, कपाट, सफरचंद, कणीस, संगणकाचा माऊस, दरवाजाची कडी, खलबत्ता आदी चिन्हांचा समावेश आहे. ही मुक्त चिन्हे प्रत्येक निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय वेगवेगळी मिळू शकतात. यामुळे छोट्या आणि नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षांना प्रचार करताना पुरती दमछाक होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि नगरपालिका, महापालिका निवडणुकांमध्ये हे आव्हान अधिक कठीण होणार आहे.

राष्ट्रीय पक्ष केवळ पाच

निवडणूक आयोगाने दिलेल्या तपशलानुसार, राष्ट्रीय पक्षांची संख्या पाच इतकी आहे. यात भारतीय जनता पक्ष (कमळ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (हातोडा, विळा आणि तारा), बहुजन समाज पक्ष (हत्ती), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात) आणि आम आदमी पक्ष (झाडू) यांचा समावेश आहे. हे पक्ष देशभरात एकसमान चिन्ह वापरू शकतात.

राज्यस्तरीय पक्ष पाच

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षही पाच आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (घड्याळ), शिवसेना (मशाल), शिंदे गट (धनुष्यबाण), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (तुतारी वाजवणारा माणूस) यांचा उल्लेख आहे.

मान्यता नसलेल्या छोट्या पक्षांपुढे आव्हान

राज्यात 416 पक्ष नोंदणीकृत आहेत. पण त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जन सुराज्य शक्ती, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), भारिप बहुजन महासंघ यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. या पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुक्त चिन्ह घेऊन उतरावे लागणार आहे.

मागच्या निवडणुकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी तुतारी, आईस्क्रीमला वगळले

मागच्या निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी तुतारी आणि आईस्क्रीमचा कोन ही चिन्हे यावेळी मुक्त चिन्हांच्या यादीत नाहीत. आईस्क्रीमचा कोन हा शिवसेनेच्या मशाल चिन्हाशी साधर्म्य  साधणारा होता तर तुतारी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागला होता. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह आहे.

अन्य राज्यांतील 9 पक्षांना राखीव चिन्हाची मुभा

इतर राज्यांतील 9 राज्यस्तरीय पक्ष महाराष्ट्रातील निवडणुकीत उतरणार आहेत. त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), जनता दल (सेक्युलर) (डोक्यावर भात घेतलेली स्त्राr), समाजवादी पक्ष (सायकल), इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम (दोन पाने), जनता दल युनायटेड (बाण), एमआयएम (पतंग), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (सिंह) आणि भारत राष्ट्र समिती (कार) यांचा समावेश आहे. हे पक्ष महाराष्ट्रातही आपले राखीव चिन्ह वापरू शकतात, पण त्यांची नोंदणी मात्र त्यांच्या मूळ राज्यात आहे.