नागपूरमध्ये पेट्रोल कॅशमध्येच मिळणार

नागपूर जिह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर 10 मेपासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतला आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कोविडनंतर देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असून काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे.

काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. जर या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे, असे यावेळी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव जैस्वाल यांनी सांगितले.