सरफराजने मुंबईला सावरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

4 बाद 66 अशा बिकट परिस्थितीतून मुंबईला सावरत सरफराज खानने पुन्हा एकदा रणजी क्रिकेटमध्ये शतक ठोकले. त्याच्या गेल्या 25 डावांतील दहाव्या शतकामुळे मुंबईने दिल्लीविरुद्ध सर्वबाद 293 अशी समाधानकारक मजल मारली.

शतकापाठोपाठ शतके ठोकूनही हिंदुस्थानी क्रिकेट निवड समितीने सरफराजकडे दुर्लक्ष केले असताना आज त्याने पुन्हा एकदा शतक ठोकून निवड समितीचा दरवाजा जोरदार ठोठावला आहे.

सरफराजचे मोसमातील तिसरे शतक

गेल्या 25 डावांत दहा शतके ठोकणाऱया सरफराज खानने गेल्या आठ डावांत तिसरे शतक साजरे केले. त्याने गेल्या 25 डावांत सातत्यपूर्ण फलंदाजी करताना दहा शतकांबरोबर पाच अर्धशतके ठोकली आहेत. यावरून त्याची फलंदाजी किती दमदार झालीय याची सर्वांना कल्पना आली आहे. मात्र हिंदुस्थानी निवड समितीने सरफराजच्या या खेळय़ांकडे कानाडोळा करीत त्याला हिंदुस्थानी संघापासून दूरच ठेवले आहे.

मुंबईची घसरगुंडी

दिल्लीने मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर पृथ्वी शॉने मुशीर खानच्या साथीने 53 धावांची सलामी दिली, पण तो 40 धावांत 9 चौकार ठोकत माघारी परतला आणि मुंबईच्या डावाला घसरण लागली. विजयरनने अरमान जाफर (2), मुशीर खान (14) आणि अजिंक्य रहाणे (2) यांना बाद करीत मुंबईची 4 बाद 66 अशी घसरगुंडी उडवली. मात्र त्यानंतर सरफराज खानने एकहाती किल्ल।़ लढवत मुंबईला संकटातून बाहेर काढले. त्याने शम्स मुलानीबरोबर सहाव्या विकेटसाठी 144 धावांची भागी रचून मुंबईला सुस्थितीत आणले. ही जोडी फुटल्यावर सरफराजची 155 चेंडूंतील 125 धावांची खेळी 16 चौकार आणि 4 षटकारांनंतर थांबली. तो बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव 293 धावांवर संपला. दिल्लीच्या प्रणशु विजयरनने 66 धावांत 4 विकेट टिपल्या.