
सांगली जिह्यात पोलीस दलाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. एका हवालदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडेच खंडणी मागितल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी या हवालदारावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला रात्रीच अटक करण्यात आली आहे.
स्वप्नील विश्वास कोळी (वय 39, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.
आरोपी कोळी हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. जानेवारी 2022 मध्ये कोळी पीडित मुलगी राहत असलेल्या कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात गेला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केले. शिवाय ती रेड लाईट एरियात राहत असल्याने येथे राहायचे असेल, तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत त्याने तिच्याकडे खंडणीची मागणी केली. ही घटना घडल्यानंतर एका सामाजिक संस्थेने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांनी या प्रकरणाची चौकशीही केली होती. यामध्ये हवालदार कोळी दोषी आढळला. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री त्याच्यावर तो कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला. कोळी याच्यावर गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या पथकाने कोळी याला अटक केली.
दरम्यान, या गोष्टीची कोठेही चर्चा होऊ नये, यासाठी पोलिसांनी आरोपी स्वप्नील कोळी याला अटक केल्यानंतर त्याला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. याबाबत सांगली पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके तपास करीत आहेत.


























































