तीन एकर जमिनीमध्ये सड्यावर तरुणांनी पिकवला भाजीचा मळा; मिळतोय चांगला नफा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणतीही गोष्ट करायला जिद्द महत्त्वाची असते तसेच शेतीमध्ये कष्ट ही महत्वाचे ठरतात. हातात असलेली नोकरी सांभाळून संगमेश्वर जवळच्या डिंगणी येथील तरुणांनी तीन एकर सड्यावरील जमिनीवर भाजीचा मळा पिकवला आहे. यामध्ये वांगी, मिरची, टोमॅटो,भेंडी, गवार, आदीचे उत्पादन घेतले आहे. उत्पादन आणि स्थानिक बाजारपेठेत विक्री हे गणित जमल्याने या तरुणांना भाजीपाला लागवडीतून चांगला नफा मिळत आहे.

भाजीपाला लागवड करण्यासाठी डिंगणी गावातील महेश मिरगल, मनोज काजरेकर, नितीन मोहिते, सागर काजरेकर मिलिंद खाडे सुदर्शन मोहिते प्रदीप काष्टे,विलास मिरगल एकत्र आले. डिंगणी सड्यावरील जमिनीत भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जवळच असलेले पाणी पंपाच्या साह्याने शेतीत आणण्यात आले. त्यानंतर ते ही भाजीपाल्याची शेती करत आहेत. या जागेत ते वांगी टोमॅटो मिरची आदी पिके घेत आहेत. त्यांतून चांगला नफा मिळथ असल्याने तरुणांनी पिकवलेल्या या भाजी माळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तरुणांनी केलेल्या भाजीपाला लागवडीतून जे उत्पन्न मिळते त्याला संगमेश्वर येथील स्थानिक बाजारपेठ तसेच घरगुती ग्राहक उपलब्ध होत असल्याने विक्रीचा प्रश्न संपुष्टात आला आहे. बाजारपेठेत गावठी भाजीपाल्याला नेहमीच मोठी मागणी असते. त्यामुळे या तरुणांनी केलेल्या भाजीला दरही चांगला मिळत असल्याने त्यांच्यातील उत्साह वाढल्याचे महेश मिरगल याने सांगितले. भाजीला असलेली मागणी आणि उत्पादन यामध्ये मागणी अधिक असल्याने आम्ही उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असल्याचे महेश मिरगलने नमूद केले.

सेंद्रीय खतांचा वापर
भाजीपाला लागवडीआधी आम्ही अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास केला. तालुक्यातील काही भाजी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भेटलो. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि नंतर एकत्रितपणे उत्पादन घेण्याचे ठरवले. यासाठी आम्ही प्रथम गांडूळ खताची निर्मिती केली. रोपांना शेणखतासह गांडूळ खताची मात्रा दिल्याने उत्पादन तर वाढलेच शिवाय बाजारपेठेत सेंद्रीय खतावरील भाजीला अधिक मागणी असल्याने विक्रीचा प्रश्न सुटला. तीव्र उन्हाळ्यामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे थोडा परिणाम उत्पादनावर होत असला तरी पाण्याची मात्रा वाढवून आम्ही नुकसान कसे टाळता येइल याचा प्रयत्न करत असल्याचे मनोज काजरेकर याने सांगितले.