हितसंबंधावरून दिग्गज खेळाडू होताहेत टार्गेट, आता विराटवर आरोप

963

क्रिकेटपटू जर बीसीसीआयशी सलंग्न असेल तर त्याला दोन ठिकाणी नोकरी करता येणार नाही. राजेंद्र लोढा समितीकडून ही शिफारस करण्यात आली. याचा अर्थ त्या खेळाडूला दोन ठिकाणांहून पैसा कमवता येणार नाही. सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली या महान खेळाडूंना हितसंबंधाच्या मुद्यावरून टार्गेट केले असतानाच आता नवीन प्रकरणसमोर आले आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीची हित जोपासण्याच्या मुद्यावर तक्रार केली असून बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी के जैन या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. बीसीसीआयने मात्र आपल्या कर्णधाराची पाठराखण यावेळी केली आहे.

कोहलीला बाजू मांडण्याची संधी

डी के जैन यावेळी म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये काही तथ्य आहे का याची तपासणी करणार आहोत. विराट कोहलीलाही आपली बाजू मांडायला देणार आहोत.

काय आहे प्रकरण

विराट कोहली हा कॉर्नरस्टोन व्हेंचर पार्टनर्स एलएलपी या कंपनीत संचालक म्हणून कार्यरत आहे. या कंपनीत अरूण सजदेह व बिनॉय खिमजी हेदेखील सहसंचालक आहेत. मात्र हे दोघेही कॉर्नरस्टोन क्रीडा एण्टरटेन्मेण्ट लिमीटेडचे भाग आहेत. ही कंपनी विराट कोहली व्यतिरिक्त लोकेश राहुल, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, कुलदीप यादव या हिंदुस्थानी खेळाडूंच्या व्यावसायिक हितांचे व्यवस्थापन करते. त्यानुसार संजीव गुप्ता यांनी तक्रार केली आहे की, विराट कोहली सध्या हिंदुस्थानी संघाचा कर्णधार आहे. तसेच तो कंपनीचा संचालकही आहे. त्याच्याकडून बीसीसीआयच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. त्याने एका पदाचा त्याग करावा, असे संजीव गुप्ता यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या