6 हजार कमावणाऱ्या मजुराला Income Tax ची नोटीस, साडे तीन कोटी भरण्याचे आदेश

1195

आयकर विभागाची नोटीस पाहून मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात राहणाऱ्या रवी गुप्ता नावाच्या तरुणाला फेफरं येणं बाकी राहिलं होतं. त्याला आयकर विभागाने नोटीस धाडली असून तत्काळ साडेतीन कोटी रुपये जमा करा असे आदेश दिले आहे. रवी हा मजुरीचं काम करतो आणि त्याला महिन्याला फक्त 6 हजार रुपये मिळतात.सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या रवी गुप्ताच्या आयुष्यात या नोटीसमुळे हलकल्लोळ माजला आहे.

रवी गुप्ताला 30 मार्च 2019 साली आयकर विभागाची नोटीस आली होती. ज्यात साडेतीन कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले होते. ही रक्कम 17 जानेवारी 2020 पर्यंत भरण्यास त्याला सांगितलं होतं. रवीला हे कळायला मार्गच नाहीये की ज्याचं उत्पन्न महिन्याला सहा हजार रुपये आहे त्याला ही नोटीस का यावी आणि इतकी मोठी रक्कम भरायला त्याला का सांगण्यात यावे. रवीने आयकर विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला. त्याला कळालं की त्याला ही नोटीस आयकर विभागाने नियमबाह्य बँक व्यवहारासाठी पाठवली आहे. रवीच्या नावाने अॅक्सिस बँकेत बोगस खातं उघडण्यात आलं होतं. खाते उघडताना रवी हा उद्योगपती असल्याचं सांगण्यात होतं. रवीच्या पॅनकार्डाचा तपशील वापरून हे खातं सुरू करण्यात आलं होतं. खातं सुरू करण्यासाठी जी सही करण्यात आली होती ती देखील रवीच्या सहीशी मिळतीजुळती असल्याचं दिसून आलं आहे. या खात्यातून 2011 साली 132 कोटींचा व्यवहार करण्यात आला होता.

रवीने म्हटलंय की तो आय़ुष्यात कधी मुंबईला आलेला नाही, मात्र खातं सुरू करत असताना त्याचा पत्ता आणि तर सगळी माहिती मुंबईची देण्यात आली आहे. मात्र आयकर विभाग त्याचं म्हणणं ऐकायला तयार नाहीये. त्यांच्या मते हे खातं रविचंच असून त्यानेच हा व्यवहार केला असल्याचं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रविने त्याचा पगारही सांगितला मात्र अधिकाऱ्यांनी त्याचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्याला एकामागोमाग नोटीस पाठवणं सुरूच ठेवलं. तक्रार करायची असेल तर मुंबईच्या कार्यालयात जाऊन कर , असं सांगून अधिकाऱ्यांनी रविला कटवलंय.

आपली प्रतिक्रिया द्या