भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाचे छापे

तेलंगाणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतदानापूर्वी आयकर विभागाने तेलंगाणाता विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. हैदराबाद, आदिलाबाद, करीमनगर, वारंगल जिल्ह्यात विविध ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. तेलंगाणात सत्ताधारी पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या आणि काँग्रेस नेत्यांविरोधात ही छापेमारी करण्यात आली आहे. मंगळवारी प्रामुख्याने काँग्रेस नेत्याच्या घर, कार्यालयांवर छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.

1 नोव्हेंबरला पक्षबदल, 21 नोव्हेंबरला छापे

आयकर विभागाने मंगळवारी चेन्नूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जी विवेकानंद यांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. ही कारवाई बुधवारीही सुरू होती. छापेमारी झाली तेव्हा विवेकानंद हे घरीच होते. जी.विवेकानंद हे पूर्वी भाजपमध्ये होते आणि ते जाहीरनामा समितीचे सदस्य होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधून राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी 1 नोव्हेंबरला काँग्रेस प्रवेश केला होता. विवेकानंद हे तेलंगाणातील सगळ्यात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. ते विसाका इंडस्ट्रीजचे मालक असून त्यांच्या मालकीच्या हैदराबाद, मंचेरियल आणि कुमारमभीम आसिफाबाद जिल्ह्यातील घर आणि कार्यालयावर छापे मारण्यात आले.

विवेकानंद हे तेलंगाणातील वी6 नावाच्या वृत्तवाहिनीचे मालक असून ते वेलुगू वृत्तपत्राचेही मालक आहेत. विवेकानंद हे सगळ्यात श्रीमंत उमेदवार असून ते अंदाजे 600 कोटींचे मालक आहेत. या व्यतिरिक्त पेद्दपल्ली जिल्ह्यातील मंचेरयाला आणि रामागुंडम येथील एनटीपीसी भागातील त्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. विवेकानंद यांचे भाऊ आणि बेल्लमपल्ली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विनोद यांच्या बंजारा हिल्सच्या घराचीही झडती घेण्यात आली. आयकर विभागाने विवेकानंद आणि त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी केली आहे.

आठ कोटी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हैदराबाद सैफाबाद पोलिसांनी नुकतीच बशीरबाग येथील आयडीबीआय बँकेची तपासणी केली. यावेळी त्यांनी व्हिजिलंस सेक्युरिटी सर्व्हिसेसच्या खात्यात जमा केलेल्या आठ कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती घेतली. हे पैसे विशाखा इंडस्ट्रीजच्या एचडीएफसी खात्यातून पाठवण्यात आल्याचे आढळून आले.