चाकरमान्यांच्या तपासणीसाठी आणखी तपासणी नाके वाढवा! प्रसाद नारकर यांची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी

546

जिह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या तपासणीसाठी खारेपाटणप्रमाणे आणखी तपासणी नाके वाढवावेत, जेणेकरून चाकरमान्यांची होणारी गैरसोय दूर होईल. त्याचप्रमाणे खारेपाटण येथे सुरू असलेल्या एकमेव तपासणी नाक्यावर ताण येणार नाही, अशा सूचना संबंधित मंत्र्यांना द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद नारकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आगामी गणेशोत्सवासाठी जिह्यात मोठय़ा संख्येने मुंबईकर चाकरमानी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिह्याचे प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण येथे येणाऱया चाकरमान्यांसाठी तपासणी नाका सुरू केला आहे. संपूर्ण जिह्यात येणाऱया चाकरमान्यांची एकाच ठिकाणी नोंदणी, तपासणी केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. येथे गर्दी होत असल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. एकाच तपासणी नाक्यामुळे पोलीस, आरोग्य प्रशासनावर त्याचा ताण येत आहे. यासाठी जिह्यातील तळेरे येथे, देवगड तालुक्यासाठी नांदगाव तिठा येथे तर विजयदुर्ग भागात जाण्यासाठी कासार्डे तिठा येथे असे तीन नवीन तपासणी नाके सुरू करावेत. त्यामुळे खारेपाटण येथील एका तपासणी नाक्यावर होणारी गर्दी कमी होऊन प्रवाशांनाही तासन्तास ताटकळत राहावे लागणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या