
11 वर्षांत 1.1 अब्ज म्हणजेच 111 कोटी प्रवासी संख्या गाठलेल्या वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गिकेचा प्रवास आणखी सुकर झाला आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने अतिरिक्त आठ फेऱ्या प्रवासी सेवेत दाखल केल्या आहेत. त्यानुसार आता दररोज वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोच्या 452 फेऱ्या चालवण्यात येत आहेत. ‘पीक अवर्स’ला दर 3 मिनिटे 20 सेपंदांनी मेट्रो धावत आहे.
पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणारी मेट्रो मार्गिका असल्याने वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गिकेला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सध्या या मार्गिकेवर एकूण 14 ट्रेन्स सेवेत असून त्यांच्याद्वारे दरदिवशी 452 फेऱ्या चालवल्या जात आहेत. ‘पीक अवर्स’व्यतिरिक्त अन्य वेळेत दर 7 मिनिटांनी ट्रेन चालवली जात आहे. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी गरज विचारात घेऊन मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतल्याचे मेट्रो वनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.