
पाउस म्हणजे तरलता.. रिमझिम सरी.. गप्पा.. गाणी.. चटकदार खाणे आणि बरेच काही.. खरोखरच या सर्व मजेव्यतिरिक्त पावसाचा मोसम म्हणजे आपल्या स्वत:ची या दमट हवेपासून काळजी. सर्दी, खोकला, ताप हे तर पावसाचे सोबती.. पण याव्यतिरिक्त इतर अनेक दुखणी किंवा विकार या पावसात अनुभवाला येतात. यामध्ये ज्यांना संधिवाताचे दुखणे असते ते या दमट हवेत जास्तच बळावते. अशावेळी थोडी काळजी घेतली तर या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
मानवी शरीराला आकार देण्याचे महत्वाचे काम शरीरातील हाडे करीत असतात. एवढेच नव्हे तर शरीरातील हृदय, फुफ्फुसे, मेंदू, मज्जारज्जू, अशा नाजूक भागांच्या संरक्षणाचे कामही हाडेच करीत असतात. माणसाच्या ३०व्या वर्षापर्यंत हाडांची घनता किंवा मजबुती ही चांगली असते. त्यानंतर ती कमी होऊ लागते. चाळीशीनंतर मात्र आपल्यापैकी प्रत्येकानेच हाडांची विशेष काळजी घ्यायला हवी. स्त्रियांचं शरीररचना जरा जास्तच गुंतागुंतीची असते. शिवाय स्वत:कडे केले जाणारे दुर्लक्ष, वेळी अवेळी घेतल्या जाणाऱ्या वेदनाशामके, जेवणाच्या अनियमित वेळा, व्यायामाचा अभाव, मेनोपॉजदरम्यान बदलणारे हार्मोन्स या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे हाडे ठिसूळ होणे. ओस्टीओपोरोसीस सारखा संधिवाताचा प्रकार मागे लागणे. पावसाच्या दमट हवेत तर हा विकार जास्तच बळावतो. हाडे कमकुवत करतो. साधारणपणे तीन स्त्रियांमागे एका महिलेला हा आजार असतोच. यासाठी काही सोप्या गोष्टींचे पालन करूया.
* वजनावर नियंत्रण – वजन नेहमी आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. वजन खूप जास्त असणे किंवा प्रमाणाबाहेर कमी असणे हाडांसाठी धोकादायक ठरू शकते.
* व्यसन – धुम्रपान, मद्यपान यासारख्या सवयी वेळीच आटोक्यात आणा. कॅफिन, अल्कोहल, आम्लता यामुळे हाडांची झीज होते. त्यांना पुरेसे काल्शियम मिळत नाही.
* पथ्य आणि आहार – खूप तिखट, तेलकट , वजन वाढवणारा आहार, हवाबंद शीतपेये यानेही हाडे ठिसूळ होतात. हिरव्या भाज्या, पालेभाज्या, दुध, खजूर, सुकामेवा, घरगुती साजूक तूप, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करा. दुध, दही, तुपामुळे हाडांचे एकमेकांवर घासणे कमी होते. शरीराला काल्शियमचा पुरवठा होतो. यातून हाडे बळकट होतात.
* ड जीवनसत्व – सध्या पावसाचे दिवस असल्याने सूर्यप्रकाशातून ड जीवनसत्व मिळाले नाही तरी सप्लीमेंटमधून ड जीवनसत्व अवश्य घ्या.
* व्यायाम – नियमित व्यायाम केल्याने हाडे मजबूत होतात. हाडांची शक्ती वाढते. क्षमता आणि घनताही वाढते. यामध्ये वजन उचलण्याचा वयमा अवश्य करावा. यामुळे हाडांची क्षमता वाढते. पण हा व्यायाम प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करावा.