#INDvBAN डे-नाईट कसोटीतील ‘हे’ सत्र आव्हानात्मक, पुजाराने सांगितली समस्या…

631

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात कोलकाता येथे 22 नोव्हेंबरला डे-नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे. हिंदुस्थानचा संघ आणि बीसीसीआय पहिल्या डे-नाईट कसोटीच्या तयारीला लागला आहे. मोठ्या धुमधडाक्यात हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा याने डे-नाईट कसोटीमध्ये काय समस्या होऊ शकते हे सांगितले आहे. ‘डे-नाईट कसोटीमध्ये सूर्यास्ताची वेळ सर्वात आव्हानात्मक असणार आहे’, असे पुजारा म्हणाला आहे.

टीम इंडिया पहिल्यांदाच गुलाबी चेंडूने डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिनाही उपस्थित राहणार आहे. बीसीसीआयने याची खास तयारीही केली आहे. याच कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पुजारा म्हणाला की, ‘मी यापूर्वी दुलिप ट्रॉफीमध्ये गुलाबी चेंडूचा सामना केला आहे. तो एक चांगला अनुभव होता. स्थानिक क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूने खेळल्याचा फायदा येथे होऊ शकतो.’

तो पुढे म्हणाला की, दिवसा सूर्याचा प्रकाश असल्याने गुलाबी चेंडू खेळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, परंतु सूर्यास्ताच्या वेळी प्रकाश कमी होत जातो आणि याचा प्रभाव खेळावर पडू शकतो. सूर्यास्ताचा वेळ सामन्यातील सर्वात महत्त्वाचा काळ असेल असेही तो यावेळी म्हणाला. एक फलंदाज म्हणून गुलाबी चेंडूने खेळण्याचा माझा वैयक्तीक अनुभव चांगला आहे. परंतु अन्य खेळाडूंशी चर्चा केली असताना त्यांनी लेग स्पिनर्सला खेळणे आणि गुगली समजणे थोडे अवघड असल्याचे सांगितले असेही पुजाराने म्हटले.

सराव महत्त्वाचा
टीम इंडियाचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू अजिंक्य रहाणे म्हणाला की, डे-नाईट कसोटीपूर्वी सरावाला विशेष महत्व आहे. ‘मी डे-नाईट कसोटीसाठई उत्सुक आहे. हा आव्हानात्मक सामना असेल. नक्की काय होईल हे सामना खेळतानाच कळेल. सामन्यापूर्वी दोन दिवस आधी गुलाबी चेंडूने सराव करणार आहे. गुलाबी चेंडू किती स्विंग होते आणि त्यात काय बदल होतो हे जाणून घेण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे’, असे रहाणे म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या