…तर तिसरी सुपर ओव्हरही झाली असती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कितीदा सुपर ओव्हर टाकता येते? आयसीसीच्या नियमानुसार जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर टाकता येऊ शकते. दुसरी सुपर ओव्हरही टाय झाली असती तर तिसरी सुपर ओव्हरही संघांना टाकावी लागली असती. सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हरचा थ्रिलर सुरूच राहणार. हा नियमच आहे.

बुधवारी सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे दोन्ही संघांना दुसरी सुपर ओव्हरही खेळायला मिळाली आणि सर्वांचे लक्ष सुपर ओव्हरच्या नियमांकडे वेधले गेले. सुपर ओव्हरचा साधा आणि सोपा नियम आहे. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत दोन्ही संघांना सुपर ओव्हर खेळावी लागणार. जर सुपर ओव्हर पूर्ण होण्याआधी पावसाचा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही तर तो सामना टायच राहतो.

सलग पाठलाग करू शकत नाही

सुपर ओव्हरमध्ये संघाच्या फलंदाजीचा क्रम सारखा बदलत असतो. बुधवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी केली, पण सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान प्रथम फलंदाजीला उतरला. तसेच दुसऱया सुपर ओव्हरमध्ये हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी घेतली. सुपर ओव्हरमध्ये कोणताही संघ सलग दोन डावात लक्ष्याचा पाठलाग करू शकत नाही.

गोलंदाजाला पुन्हा गोलंदाजी नाहीच

सुपर ओव्हरमध्ये जो गोलंदाज पहिले षटक फेकतो तो पुन्हा गोलंदाजी करूच शकत नाही. त्यामुळे दुसऱया सुपर ओव्हरमध्ये ना ओमरझईने गोलंदाजी केली ना मुकेश कुमारने. दुसऱया सुपर ओव्हरमध्ये हिंदुस्थानने रवी बिष्णोई तर अफगाणने फरीद अहमदला चेंडू दिला.

टी-20 इतिहासात तिसऱयांदाच सुपर ओव्हर टाय

सुपर ओव्हर बरोबरीत सुटण्याचा प्रकार केवळ तिसऱयांदाच घडला. 2019 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिली सुपर ओव्हर टाय झाली, पण तेव्हा इंग्लंडला मुख्य सामन्यात सर्वाधिक बाऊंड्रीज (चौकार-षटकार) मारल्यामुळे विजयी घोषित करण्यात आले. मात्र यानंतर हा बाऊंड्रीजचा नियम बदलण्यात आला. तसेच 2020 साली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील पहिली सुपर ओव्हर टाय झाली होती, मात्र दुसऱया सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला.

रोहित फलंदाजीला येणे नियमबाह्य?

एमसीसीच्या नियमानुसार जो फलंदाज पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला असेल तर तो दुसऱया सुपर ओव्हरमध्ये खेळायला येऊ शकत नाही. सुपर ओव्हर सुरू होण्याआधी जे तीन फलंदाज सुपर ओव्हर खेळणार आहेत त्यांची नावे दोन्ही संघांना जाहीर करावी लागतात. जर कोणत्याही फलंदाजांची सुपर ओव्हरसाठी निवड केली गेली होती, पण त्याला फलंदाजीच मिळाली नाही किंवा तो बादच झाला नाही तर तो दुसऱया सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला उतरू शकतो. तसेच जर तिसऱयाही सुपर ओव्हरमध्ये खेळावे लागले तर हाच नियम पुढे वाढत जाईल. जर एखादा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाला असेल तो विकेट पडल्यावर किंवा पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला उतरू शकतो. एमसीसी नियमानुसार रोहित शर्माचे फलंदाजीला येणे योग्य आहे. सामन्यादरम्यानही एखादा खेळाडू रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर किंवा विकेट पडल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो.