हिंदुस्थान–ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून टी–20 धमाका, कोहली मात्र नाखूश

25

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया एका महिन्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहे. विशाखापट्टणमला उद्या पहिल्या टी-20 क्रिकेट लढतीने उभय संघांतील द्विपक्षीय मालिकेस प्रारंभ होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पावसाच्या व्यत्ययामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. विशेष म्हणजे, गतवेळी ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थान दौऱ्यावर आला होता तेव्हाही टी-20 मालिका 1-1 अशीच बरोबरीत सुटली होती. त्यामुळे यावेळी मालिका विजयाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार याबाबत क्रिकेटशौकिनांमधील उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केले होते. आता विराट कोहलीची सेना दोन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. याचबरोबर तोंडावर आलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व खेळाडूंची चाचपणी करण्याची विराट कोहलीला अखेरची संधी असेल.

कोहली नाखूश

इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. विश्वचषक स्पर्धा तोंडावर असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळण्याबद्दल ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेऐवजी आणखी दोन एकदिवसीय सामने वाढविले असते तर ते हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या फायद्याचे ठरले असते, असे मत कोहलीने व्यक्त केले. कोहली म्हणाला, दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘टीम इंडिया’ दोन टी-20 सामन्यांची, तर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर 30 मेपासून विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका हिंदुस्थानसाठी विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीमच असेल. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन टी-20 मालिकेऐवजी सात सामन्यांची एकदिवसीय मालिका अधिक फायदेशीर ठरली असती, असे कोहली म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या