
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानचा अखेरचा पाचवा टी-२० क्रिकेट सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला. मात्र, पाहुण्या ‘टीम इंडिया’ने ही बहुचर्चित मालिका २-१ फरकाने खिशात घातली. सामन्याच्या सुरुवातीला शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात दिसला आणि हिंदुस्थानने अवघ्या ४.५ षटकांत बिनबाद ५२ धावांची बरसात केली. मात्र, त्यानंतर विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने सलग पाचवी द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकली, हे विशेष.
प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानची आघाडीची फळी ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर कशी खेळणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष होते. मात्र, जोश हेजलवूडच्या अनुपस्थित अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ४.५ षटकांत ५२ धावांची लयलूट केली. अभिषेकला दोनदा जीवनदान मिळाले, तर गिलने १६ चेंडूंत २९ धावा करत अप्रतिम फॉ र्म दाखवला.
मालिकेची सुरुवात अन् शेवट पावसाने
या टी-२० मालिकेची सुरुवात आणि शेवट दोन्ही वेळा पावसानेच झाली. कॅनबरामधील पहिला सामना आणि आता ब्रिस्बेनमधील पाचवा सामना हवामानाच्या अडथळ्यामुळे रद्द झाला. मेलबर्नमध्ये दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर जिंकला. मात्र, होबार्ट आणि गोल्ड कोस्टवरील मंदगतीच्या खेळपट्टीवर हिंदुस्थानी फिरकीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत मालिका जिंकली.
हिंदुस्थान आता घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी आत्मविश्वासाने परतेल. हिंदुस्थानी कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘प्रत्येक सामन्यात सर्वांनी योगदान दिलं. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या सर्व स्तरांवर हिंदुस्थानी खेळाडूंनी सकारात्मक खेळ केला. हिंदुस्थानी महिला संघाने घरच्या मैदानावर जगज्जेतेपद मिळवलं, हा प्रेरणादायी क्षण ठरला. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना दडपण असतं, पण उत्साहही तितकाच असतो.’
ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श म्हणाला, ‘पावसामुळे मालिकेत बरोबरी साधण्याची संधी हुकली. तरीही या मालिकेतून बरेच धडे आणि सकारात्मक गोष्टी मिळाल्या. विश्वचषकाच्या वर्षात आमच्या संघाची लवचिकता आणि तयारी उल्लेखनीय आहे.’
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी हिंदुस्थानला आमंत्रण देणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श हसत होता. मात्र, लवकरच हिंदुस्थानी सलामीवीरांनी केलेल्या धडाक्याने त्याचा चेहरा उतरला. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज बेन ड्वार्फ्यूसच्या चेंडूवर अभिषेकने चौथ्याच चेंडूवर कव्हरच्या वरून चौकार पटकावला. पुढच्या चेंडूवर त्याचा झेल मॅक्सवेलने सोडल्याने ऑस्ट्रेलियाच्या निराशेत भर पडली. दुसरीकडे शुभमन गिल मात्र विलक्षण फॉर्मात दिसला. इवार्ग्यूसच्या षटकात चौकार झोडले. त्यातील एक अप्रतिम कव्हर ड्राइव्ह डोळ्यांची पारणे फेडणारा होता. अभिषेकला पुन्हा जीवदान मिळाल्यानंतर त्याने नॅथन एलिसला षटकार ठोकला. मात्र, ब्रिस्बेनच्या हंगामातील पारंपरिक हवामानाने पुन्हा अडथळा आणला. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि अखेरीस रद्द करण्यात आला.

























































