
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाचवा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाणा उडाली होती. प्रसिध कृष्णा (4 विकेट) आणि सिराज (4 विकेट) यांनी अर्ध्याहून अधिक संघ तंबुत धाडला. यांना आकाश दीपनेही मोलाची साथ दिली. गोलंदाजी केल्यानंतर आकाश दीपने आपल्या फलंदाजीने आता सर्वांना प्रभावित केले आहे. नाईटवॉचमन म्हणून मैदानात उतरलेल्या आकाशने इंग्लंडच्या घातक माऱ्याचा संयमाने सामना केला आणि अर्धशतकीय खेळी केली आहे.
केएल राहुल (7) आणि साई सुदर्शन (11) यांच्या झटपट विकेट गेल्यामुळे 70 धावांवर 2 विकेट अशी टीम इंडियाची अवस्था झाली होती. टीम इंडियाला या कठीण परिस्थितीतून यशस्वी जयस्वाल आणि आकाश दीपने बाहेर काढलं. दोघांनीही संघाचा डाव सावरला. यशस्वीला आकाश दीपने चांगली साथ दिली. आकाश दीपने 94 चेंडूंचा सामना केला आणि 12 चौकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. त्याचं हे कसोटी कारकिर्दीमधलं पहिल अर्धशतक ठरलं आहे. त्याचबरोबर नाईटवॉचमन म्हणून फलंदाजी करताना 2011 सालानंतर अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2011 साली अमित मिश्राने नाईटवॉचमन म्हणून फलंदाजी करताना 88 धावांची खेळी केली होती.
टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून आतापर्यंत 198 धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याचा तिसरा दिवस सुरू असून टीम इंडियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 221 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जयस्वाल (104*) करुण नायर (11*) फलंदाजी करत आहेत.