
विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी अन् रविचंद्रन अश्विन या स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत नव्या दमाच्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या स्वारीवर गेलेल्या ‘टीम इंडिया’कडून कोणालाही फारशी अपेक्षा नव्हती. संक्रमण अवस्थेतून जात असलेल्या या हिंदुस्थानी संघाची इंग्लंडसारख्या दौऱयावर खरी ‘कसोटी’ होती. मात्र टीम इंडियाने ही बहुचर्चित पाच सामन्यांची ‘तेंडुलकर-अॅण्डरसन ट्रॉफी’ 2-2 अशी बरोबरीत सोडविण्याचा पराक्रम केला. बलाढय़ इंग्लंडविरुद्ध जोरदार संघर्ष करून शुभमन गिल हा नेतृत्वाच्या ‘कसोटी’त पास झाला, अशीच चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
गिल आणि स्टोक्स यांच्या नेतृत्वाखालील संघांमध्ये कसोटी क्रिकेट मालिकेत जोरदार टक्कर बघायला मिळाली. 45 दिवसांच्या मालिकेत या प्रदीर्घ मालिकेत उभय संघांमध्ये तुल्यबळ लढत बघायला मिळाली. लीड्सवरील पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने बार्ंमगहॅममधील दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन केले. मात्र, इंग्लंडने लॉर्ड्सवरील तिसऱया कसोटीत बाजी मारून पुन्हा मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळविली. मग मँचेस्टरमधील चौथी कसोटी ड्रॉ झाल्याने पाचव्या अन् अखेरच्या ओव्हल कसोटीला महत्त्व प्राप्त झाले. मात्र साडेतीन दिवस वर्चस्व गाजविलेल्या यजमान इंग्लंडला या निर्णायक कसोटीत पराभवाचा धक्का देत हिंदुस्थानने मालिका बरोबरीत सोडविण्याची किमया साधली अन् क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा टीम इंडियाची शान वाढली.
‘टीम इंडिया’चे भविष्य सुरक्षित हाती
इंग्लंड दौऱयावरील या खडतर मालिकेतून हेही स्पष्ट झाले की, हिंदुस्थानी क्रिकेटचे भविष्य नक्कीच सुरक्षित हातात आहे. कर्णधार गिलने कसोटी मालिकेत सर्वाधिक 754 धावांची लयलूट करीत आपल्या नेतृत्वाची छाप सोडत इतर खेळाडूंना प्रेरणाही दिली. सलामीवीर म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱयागिलने कसोटीतील महत्त्वाच्या क्रमांकावर स्वतःला सिद्ध करताना टीम इंडियाला अनेक सामन्यांत भक्कम स्थितीत पोहोचविले. शिवाय त्याने मैदानावर गोलंदाजी ताफ्याचा खुबीने वापर करून इंग्लंडचे मालिका विजयाचे मनसुबे धुळीस मिळविले. गिलनंतर के. एल. राहुल (532) व रवींद्र जाडेजा (516) हे या कसोटी मालिकेत 500 हून अधिक धावा करणारे फलंदाज ठरले. ऋषभ पंतने 479 धावा फटकाविल्या. दुखापतीमुळे अखेरच्या कसोटीस मुकल्याने त्याला 500 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
बुमराच्या अनुपस्थितीत सिराजची चमक
मोहम्मद सिराजने संपूर्ण कसोटी मालिकेत तिखट मारा करीत 23 विकेट टिपण्याचा पराक्रम केला. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीतील दोन कसोटींत सिराजने इंग्लिश फलंदाजांना त्रास दिला. जसप्रीत बुमरा व प्रसिध पृष्णा यांनी 14-14 विकेट टिपले, तर आकाश दीपने 13 फलंदाज बाद केले. फलंदाजांप्रमाणेच ही प्रतिष्ठेची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविण्यासाठी हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनीही तितकाच मोलाचा वाटा उचलला. रवींद्र जाडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांची अष्टपैलू कामगिरीदेखील या मालिकेत ‘संकटमोचक’ ठरली.