
हिंदुस्थानने ऐतिहासिक लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. सलामीवीर लोकेश राहुलने शतक झळकावित या मैदानावर दोन शतके ठोकण्याचा पराक्रम केला. अर्धशतकवीर ऋषभ पंत 74 धावांवर दुर्दैवीरीत्या धावबाद झाल्यानंतर अनुभवी रवींद्र जडेजानेही अर्धशतक झळकाविले. हिंदुस्थानने पहिल्या डावात 119.2 षटकांत सर्वबाद 387 धावसंख्येपर्यंत मजल मारत इंग्लडच्या पहिल्या डावातील धावसंख्येशी बरोबरी केली. इंग्लडने दुसऱया डावात 2 धावा केल्या आणि आजच्या दिवसाचा खेळ थांबला.
पंत, जडेजाचे अर्धशतक
इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांवर रोखणाऱया हिंदुस्थानने दुसऱया दिवसाच्या 3 बाद 145 धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. लोकेश राहुल व रिषभ पंत यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समर्थपणे प्रतिकार केला. शुक्रवारी अर्धशतक झळकाविलेल्या राहुलने आज कारकिर्दीतील नववे, तर इंग्लंडविरुद्धचे चौथे कसोटी शतक झळकाविले. त्याने पंतच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 141 धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या थेट थ्रोवर पंत दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. त्याने 112 चेंडूंत 74 धावांची खेळी करताना 8 चौकारांसह 2 षटकार लगावले. पंत बाद झाल्यानंतर राहुलने शतकाला गवसणी घातली. 177 चेंडूंत 13 चौकारांसह 100 धावा केल्यानंतर राहुलने शोएब बशीरच्या गोलंदाजीवर ब्रूककडे झेल दिला. त्यानंतर जाडेजा आणि नितीश कुमार रेड्डी ही अष्टपैलू जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत हिंदुस्थानला सव्वातीनशे पार नेले. बेन स्टोक्सने नितीशला यष्टीमागे स्मिथकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. नितीशने 91 चेंडूंच्या संयमी खेळीत 4 चौकारांसह 30 धावांची खेळी केली. पंतनंतर जाडेजाचेही शतक हुकले. तो 131 चेंडूंत 8 चौकार व एका षटकारांसह 72 धावांवर ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेलबाद झाला.
लॉर्ड्सवर विक्रम
- ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दोन कसोटी शतके झळकाविणारा के. एल. राहुल हा टीम इंडियाचा पहिला सलामीवीर ठरलाय. त्याच्याशिवाय परदेशी सलामीवीर बिल ब्राऊन, गॉर्डन ग्रीनिज आणि ग्रॅमी स्मिथ यांनीही येथे प्रत्येकी दोन कसोटी शतके झळकावली आहेत.
- याचबरोबर लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी शतके ठोकण्याच्या बाबतीत तो हिंदुस्थानचा दुसरा फलंदाज ठरलाय. या मैदानावर सर्वाधिक तीन शतके दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहेत.
- राहुलचे हे कारकीर्दीतील नववे, तर इंग्लंडच्या भूमीवरील चौथे शतक ठरले.





























































